अलिबाग - तालुक्यात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याविरुद्ध पोलिसांनी धडक मोहिम उघडली आहे. तालुक्यातील पेढांबे, परहूरपाडा, सहाणगोटी अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या करंजाडे-पनवेल येथील चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. निखिल पद्माकर म्हात्रे, 33 वर्षे, रा.जानकी निवास, रूम नं. 202, R3, करंजाडे, पनवेल असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून 6 लाख रुपये किंमतीचे 124 ग्रॅम सोने आणि दीड लाख रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी पेढांबे पी नारंगी, येथील महिला पेढांबे गावातून जात असताना एक अज्ञात मोटार सायकल स्वाराने त्यांच्या पाठीमागून येवून फिर्यादी यांचे मानेवर हात टाकून गळ्यातीत सोन्याचे गंथन व छोटा मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली होती. तसेच अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत 15 जुलै 2023 रोजी परहूरपाडा पो.कामार्ले येथील महिला शेतामधुन चालत घरी येत असताना झारखंड डांबरी रोडवर परहूरपाडा या गावच्या बाजुकडुन अज्ञात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात इसमाने त्यांना धक्काबुकी करुन खाली पाडून गळयामधील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेली. तर तिसऱ्या घटनेत तसेच अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतच दिनांक 02 ऑक्टोबर 2023 रोजी सहाणगोटी पो.कुरुळ, ता.अलिबाग येथे महिला चालत जात असताना रस्त्यात एक दुचाकीवरील इसमाने त्यांच्या मागून गाडी आणुन गळ्यातील सोन्याची दागिने खेचुन चोरी करुन नेली होती . या तिन्ही प्रकरणात पोयनाड पोलिस ठाण्यात एक तर अलिबाग पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दखल झाले होते.
सोन साखळी चोरीच्या गुह्यांचा गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेशित केले. त्यानुसार स्थानिक पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांच्या टीमने या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरु केला. तपासा दरम्यान या गुन्ह्यामधील सीसीटिव्ही फुटेज प्राप्त करून संशयित सोन साखळी चोराचा शोध सुरु केला होता. गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील आरोपी पनवेल परिसरातील आहे. त्या माहितीआधारे करंजाडे, पनवेल येथून संशयितास ताब्यात घेऊन सी सी टी व्ही फुटेज मध्ये असलेला इसम तोच असल्याची खात्री करून त्याच्याकडे कसून तपास केला. त्याने सदर तिन्ही सोन साखळी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.
सदर गुन्ह्यातील आरोपी निखिल पद्माकर म्हात्रे याला अटक केली आहे. त्याच्याकडून तिन्ही गुन्ह्यातील चोरी केलेले एकूण 124 ग्रॅम सोने (अंदाजे किंमत 6,20,000/- रुपये) तसेच 1,50,000/- रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आलेले आहे. निखिल म्हात्रे याला न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी दिली असून त्याने आणखी अशाच प्रकारे गुन्हे केले बाबत सखोल तपास सुरु आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व त्यांचेकडील टिम पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, पोलीस हवालदार रुपेश निगडे, महिला पोलीस हवालदार अभियंती मोकल, पोलीस नाईक विशाल आवळे, पोलीस शिपाई अक्षय सावंत, पोलीस शिपाई स्वामी गावंड यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.