उल्हासनगर महापालिकेची पदपथ व रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई
By सदानंद नाईक | Published: May 1, 2024 06:43 PM2024-05-01T18:43:01+5:302024-05-01T18:44:04+5:30
रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले व दुकानदारावर महापालिकेने महाराष्ट्र दिनी कारवाई केली.
उल्हासनगर: शहरातील पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले व दुकानदारावर महापालिकेने महाराष्ट्र दिनी कारवाई केली. पदपथ मोकळे ठेवा, रस्त्यावर अतिक्रमण करू नका, अशी उद्घोषणा गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने करूनही अतिक्रमण जैसे थे होते. उल्हासनगरातील बहुतांश रस्त्यावर फेरीवाल्यांनी नियम डावलून अतिक्रमण केले. तर दुकानदारांनी थेट रस्त्याच्या फुटपाथवर साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे.
त्यामुळे नागरिकांना व वाहनांना अडचणी निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर महाराष्ट्र दिनी गोल मैदान ते नेहरू चौक, सिरु चौक परिसरात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस, महापालिकेचे सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्या पथकाने फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात धडक कारवाई केली आहे.
शहरातील दुकानदारांनी थेट फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले साहित्य महापालिका अतिक्रमण पथकाने डंपरद्वारे उचलून नेले आहे. शहरात वेगवेगळ्या भागात ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे.