आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाई- जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:13 AM2019-04-22T01:13:14+5:302019-04-22T01:13:44+5:30
रायगड मतदारसंघात कलम १४४ जारी
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असून मंगळवार २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पुढील दोन दिवस पोलीस आणि विविध पथकांना अतिशय काटेकोरपणे, काळजीपूर्वक तपासण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतेही बेकायदा तसेच आचारसंहितेचा भंग करणारे कृत्य सहन करणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात १४४ कलम लावण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे व एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या. ३२ रायगड मतदारसंघात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार आहेत. यामध्ये पुरु ष ८ लाख ९ हजार ३४४ आणि महिला ८ लाख ४२ हजार २१४ आणि ३ तृतीयपंथी आहेत. मतदारसंघनिहाय पेणमध्ये ३ लाख ७६ हजार , अलिबाग २ लाख ९२ हजार ४२१, श्रीवर्धन २ लाख ५६ हजार १८०, महाड २ लाख ८४ हजार २३०, दापोली २ लाख ७९ हजार २३८, गुहागर २ लाख ३९ हजार ४१५ मतदार आहेत. मतदार नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळी १८ ते १९ या वयोगटातील ३५४५२ नवमतदार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
७३९४ दिव्यांग असून एकूण मतदान केंद्रांपैकी १७२४ मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार असणार आहेत. या दिव्यांगांमध्ये ८५० अंध (क्षीण दृष्टी), ५४५ कर्णबधिर, मूकबधिर २७६, अपंग ३७३७ आणि इतर दिव्यांग १९८६ असे आहेत. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवर आहेत. अलिबागमधील सेंट मेरी हायस्कूल येथील मतदान केंद्र पूर्णत: दिव्यांग संचालित मतदान केंद्र असून याठिकाणी पोलीस वगळता पाचही अधिकारी व कर्मचारी दिव्यांग आहेत. एकंदर ६७३ व्हील चेअर्सची मागणी असताना ६७८ उपलब्ध व्हीलचेअर्स असून १५ ही तालुक्यातून ग्रामपंचायतींना त्या दिल्या आहेत. विस्तार अधिकारी पंचायत यांच्यावर त्यांच्या भागातील दिव्यांग मतदारांच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी टाकली असून त्यांनी रिक्षा, मिनीडोर, सुमो, मोटारसायकल्स अशी वाहने तयार ठेवली आहेत.
मतदारसंघात एकूण २१७९ मतदान केंद्रे आहेत. १९९६ ग्रामीण भागात तर १८३ शहरी भागात आहेत. मतदारसंघनिहाय पेणमध्ये ३७५, अलिबाग ३७७, श्रीवर्धन ३५१, महाड ३९२, दापोली ३६३, गुहागर ३२१ मतदान कें द्रे आहेत.१४९५ मतदान केंद्रे ही रायगड जिल्ह्यातील तर उर्वरित ६८४ केंद्रेही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात एकूण १४०५ नोकरदार आहेत. मतदारसंघनिहाय पेणमध्ये १७९, अलिबाग १६०, श्रीवर्धन ६७, महाड ४८८, दापोली २६३, गुहागर २४८ नोकरदार मतदार आहेत.
रायगडसाठी सर्वसाधारण निरीक्षक रवींद्र सिंह, खर्च निरीक्षक निलंक कुमार, तसेच ३३ मावळचे खर्च निरीक्षक चढ्ढा यांनी सातत्याने प्रशासनाकडून निवडणूकविषयक आढावा घेतला असून उमेदवारांच्या प्रतिनिधींसमवेत त्यांच्या बैठकाही झाल्या आहेत. खर्चाचे ताळमेळ जुळविणे ही प्रक्रि या सुरु आहे.
मतदान केंद्रावर सुविधा
रायगड जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक व उप मुख्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, यांच्या पथकांकडे मतदान केंद्रांवर शौचालय, एलईडी लाइट्स, पाणीपुरवठा, रेम्प आदि मूलभूत सुविधाबाबत जबाबदारी दिली असून सर्व मतदान केंद्रांवर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांमध्ये फर्निचर, मदत करण्यासाठी पथक, वैद्यकीय कीट अशा सोयी तसेच मतदारांबरोबरच्या लहान मुलांचा सांभाळ करण्याची व्यवस्था या सुविधा आहेत. पिण्याच्या पाण्याचीही स्वतंत्र सोय प्रत्येक ठिकाणी असेल.
रुग्णवाहिकादेखील उपलब्ध
हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रु ग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय केली आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका देखील नियुक्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी देखील त्यांची पथके तयार ठेवली आहेत. १०८रु ग्णवाहिका देखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहज उपलब्ध होतील हे पाहिले आहे.
मतदानास ११ ओळखपत्र पुरावे
ज्या मतदारांची नावे मतदार यादीत आहेत मात्र मतदार छायाचित्र ओळखपत्र नाही ते देखील मतदान करू शकतात. त्यासाठी खालील११ पुरावे ग्राह्य धरले जातील. यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/ राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्त यांनी दिलेले स्मार्ट ओळखपत्र, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांच्याकडील आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, निवृत्त कर्मचाºयांचे छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्रे, आमदार/खासदार यांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.
मतदानासाठी प्रभावी जनजागृती
‘मतदार मदत क्र मांक १९५०’ केंद्र स्थापन करु न जिल्ह्यातील सर्व ठिकाणी हॅन्डबिल वाटप व तालुका स्तरावर ५० ठिकाणी होर्डिंजद्वारे प्रचार व प्रसिध्दी, मतदार संघामधील सर्व तहसील विभागात, सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग, बस स्थानके, जिल्हा रु ग्णालय रायगड, जिल्हा उद्योग केंद्र रायगड येथील सर्व प्रसिध्दी फलकांवर ३० ठिकाणी होर्र्डिंग फ्लेक्स, मतदार संघाच्या ५९ ठिकाणी पथनाट्य, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाºयांकडून शपथ लिहून घेऊन त्यांच्या पालक, नातेवाईकांना संकल्प पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन, सर्व घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांवर मतदान करण्याबाबतचे स्टिकर्स, वीज देयकावर जाहिराती, गुहागर येथे वाळू शिल्पद्वारे मतदान करण्याबाबत आवाहन, महाड येथे २००० तर पेण येथेही शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने देशाचा नकाशा साकारला, आकर्षक रांगोळ्या काढल्या, ४२०७ ठिकाणी १५ चित्ररथाद्वारे जागृती करण्यात आली.