पेण अर्बनच्या ५१.८ कोटींच्या वसुलीसाठी कृती दल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:04 AM2018-08-09T03:04:15+5:302018-08-09T03:04:23+5:30
पेण अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ठेवींचा परतावा करण्यासाठी, दोषी व्यक्ती व तत्कालीन संचालकांच्या जप्त करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले.
- जयंत धुळप
अलिबाग : पेण अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ठेवींचा परतावा करण्यासाठी, दोषी व्यक्ती व तत्कालीन संचालकांच्या जप्त करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले. दरम्यान, ५० हजार रुपयांच्या वरच्या रकमेची ७८७ कर्जखात्यांमधील ५१ कोटी ८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी बँकेच्याच ५० कर्मचाऱ्यांचे कृती दल स्थापन करण्यात आले असल्याचीही माहिती बैठकीत देण्यात आली.
दी पेण को-आॅप. अर्बन बँक लि. या बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कृती समितीची बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. मात्र, ही बैठक सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. अखेर विशेष कृती समितीचे दिवंगत सदस्य बंधू साखरे यांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही जिल्हा प्रशासन आणि शासनाचा निषेध करून सभागृहातून निघून गेलो, अशी माहिती पेण को-आॅप. अर्बन बँक विशेष कृती समितीचे सदस्य नरेन जाधव यांनी दिली. त्यानंतर दुपारी २ वाजता पेण अर्बनच्या विशेष कृती समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी नरेन जाधव यांच्यासह कोणीही अशासकीय सदस्य उपस्थित नव्हते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक सी.एस. जुवेकर, जिल्हा उपनिबंधक पी.एम. खोडका, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यू. जी. तुपे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत राजे, वसुली अधिकारी काशिनाथ गावंड, सक्त संचालनालयाचे उपसंचालक प्रकाश जाधव, पोलीस उपधीक्षक (गृह) विजय पांढरपट्टे, तपास अधिकारी धनाजी क्षीरसागर, सह निबंधक पेण बी.के. हांडे, सनदी लेखापाल व्ही.एस. वैद्य उपस्थित होते.
>मालमत्ता जप्तीसाठी नियुक्तीची सूचना
दरम्यान, सक्त संचालनालय, पोलीस व सीबीआय यांनी केलेल्या कारवाईत १२८ बोगस कर्जखात्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी ४५ कोटी ८३ लाख रु पयांची वसुली झाली असून १४७ मालमत्ता अधिसूचित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत पोलीस तपास यंत्रणेमार्फत गैरव्यवहारांतील मालमत्तांचा शोध घेऊन त्या मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्षम प्राधिकाºयांनी अधिसूचना लवकरात लवकर जारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीत केली.
>२,९६६ शिल्लक कर्जखात्यांची वसुली सुरू
बँकेने ३१ जुलै २०१८ अखेर १६७ कोटी ७८ लाख रु पयांची कर्ज वसुली केली असून, एकूण ७ हजार ९७० कर्जखात्यांपैकी पाच हजार कर्जखाती बंद करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत २ हजार ९६६ कर्जखाती शिल्लक असून त्यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू आहे. त्यात ५० हजार रु पयांच्या वरच्या रकमेची ७८७ कर्जखात्यांमधील ५१ कोटी ८ लाख रु पयांची वसुली करण्यासाठी बँकेच्याच ५० कर्मचाºयांचे कृती दल गठीत करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
>६६ कोटी ३२ लाखांची रक्कम ठेवीदारांना परत
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी व अपहृत रकमेच्या वसुलीसाठी विशेष कृती समिती गठीत करण्यात आली आहे. बँकेत झालेल्या ७५८ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सद्यस्थितीत १ लाख ७१ हजार ३६९ ठेवीदारांच्या ६१४ कोटी ५० लाख रकमेच्या ठेवी परत करावयाच्या आहेत. आतापर्यंत बँकेने केवळ ६६ कोटी ३२ लाखांची रक्कम ठेवीदारांना परत केल्याचे बैठकीत सांगण्यात आले.