अनधिकृत खाणींवर कारवाई
By admin | Published: August 18, 2015 02:56 AM2015-08-18T02:56:04+5:302015-08-18T02:56:04+5:30
तालुक्यातील तोंडली येथे सुरू असलेल्या अनधिकृत खाणींवर कारवाई करून प्रभारी तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे पावणे तीन कोटींचा
खालापूर : तालुक्यातील तोंडली येथे सुरू असलेल्या अनधिकृत खाणींवर कारवाई करून प्रभारी तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे पावणे तीन कोटींचा माल व विविध प्रकारची यंत्रसामग्री जप्त केली आहे. गेली काही दिवस कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत दोन खाणी सुरू होत्या. शासनाचा लाखो रु पयांचा महसूलही या खाण मालकांनी बुडवला होता. महसूल विभागाने ही कारवाई केल्याने अनधिकृत खाण चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
खालापूर तालुक्यातील तोंडली येथे अर्जुन मोर्य यांची खाण आहे. परवानगी न घेता ही खाण सुरू होती. प्रभारी तहसीलदार उत्तम कुंभार आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकल्यानंतर १५ लाख ३२ हजार रु पयांची १९० ब्रास माती आणि दगड अवैध साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कुंभार यांनी मोर्य यांना सुमारे १५ लाख ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि मोर्य यांची १५ लाख रु पयांची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. तोंडली येथेच शिवराज कोमल सिंग यांचीही खाण आहे. सिंग यांनी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. सिंग यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे ३२२ ब्रास दगड आणि मातीचा साठा होता. परवानगी न घेता साठा केल्यामुळे १३ लाख ९६ हजार ५३० रु पयांचा दंड त्यांना करण्यात आला.(वार्ताहर)