नेरळ : शहरात बेशिस्त वाहन पार्क करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यास नेरळ ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे, यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाले आहेत. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांनी स्वागत जरी केले असले, तरी ही कारवाई कायम राहणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
नेरळ गावाचे शहरात रूपांतर होत आहे. वाढलेले नागरीकीकरण यामुळे नेरळचे रूपडे पालटत आहे. हे नागरीकीकरण लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तब्बल २२ कोटी रूपये निधी रस्त्यांसाठी देऊन नेरळच्या विकासात भर घातली. नेरळमधील रस्ते अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या सिमेंट काँक्र ीटचे होत आहेत. त्यापैकी मुख्य बाजारपेठेतला रस्ता झालाही. रस्ता झाल्यानंतर नेरळकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण जुना रस्ता अरुं द आणि खड्डेमयी होता. नेरळ शहर हे आजूबाजूच्या २० ते २५ छोट्या-मोठ्या गाव, खेडे, पाडे यांना जोडलेले असल्याने तेथील लोकांचा वावर कायम नेरळमध्ये असल्याने बाजारपेठ गजबजलेली असते. मात्र, नवीन रस्ता झाला आणि त्याला बेशिस्त पार्किंगचा विळखा पडला. या बेशिस्त पार्किंगमुळे पुन्हा एकदा वाहतूककोंडीला सुरुवात झाली. अगदी टॅक्सी स्टँडपासून ते हेटकरआळीपर्यंत हीच परिस्थिती आहे. रस्त्यावर केलेली बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांनी अडवलेले फूटपाथ यामुळे पादचाºयांना चालायलाही जागा उरत नाही. त्यातही ट्रेनचे प्रवासी आल्यावर तर बाजारपेठ हाउसफुल्ल अशी स्थिती निर्माण होते. या बेशिस्त वाहन पार्क करणाºया वाहनचालकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच यांनी निर्णय घेत नेरळ पोलिसांच्या मदतीने सोमवारपासून बेशिस्त पार्किंग होत असलेल्या वाहन व वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नेरळची बाजारपेठ मोकळी झाल्याचे चित्र आहे.
या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत जरी करण्यात आले असले, तरी ही कारवाई कायम केली जाणार का? हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. याचे कारणही तसेच आहे. मागील वेळेस अशीच कारवाई दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, दोन्ही वेळेला चार दिवस कारवाई झाली नंतरची परिस्थिती जैसे थेच झाली.