आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. रुग्णांच्या आयुष्याशी खेळणा-या या नराधमांचा बीमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. बोगस डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी तालुकास्तरावर पथके तैनात करण्यात आली आहेत. कोणतीही पदवी न घेता तसेच सक्षम यंत्रणेची परवानगी न घेता प्र्रॅक्टिस करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने बोगस डॉक्टरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये विकासाचे वारे वाहत असल्याने नागरीकरणामध्येही वाढ होत आहे. कामगार, मजूर, कष्टकरी अशा व्यक्तींना रोजच्या जीवनामध्ये आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. त्या वेळी त्यांना दवाखान्यामध्ये जावे लागते. अशा ठिकाणी बोगस डॉक्टरांचे प्रमाण अधिक असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. बोगस डॉक्टर अशा व्यक्तींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्यावर थातूरमातूर उपचार करीत असल्याच्या घटना घडत आहेत. तज्ज्ञ अथवा वैद्यकीय पदवी घेतलेल्या डॉक्टरांकडून उपचार घेतले जात नसल्याने संबंधिताच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. काही प्रकरणामध्ये तर, रुग्णांची स्थिती गंभीर झाल्याच्या तक्रारीही जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडे झाल्या होत्या. बोगस डॉक्टर रुग्णांकडून पैसे उकळून त्यांचे आरोग्यही धोक्यात घालत असल्याने अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे होते.जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई उपस्थित होते. रुग्णांच्या आयुष्याशी खेळणाºया बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी दिले. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी अध्यक्ष असलेल्या समिती, नगरपालिका क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी आणि पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आयुक्त यांनी मरगळ झटकून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असणाºया बोगस डॉक्टरांची कुंडली तयार करून ती जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीकडे सोपवायची जबाबदारी तालुकास्तरीय समितीला देण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत संबंधित पोलीस ठाण्याकडे तक्रार करून बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील आयएमए, आरएमए आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना, होमीओपॅथी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचीही मदत घेण्यात यावी, असेही निर्देश सूर्यवंशी यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:48 AM