पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
By राजेश भोस्तेकर | Published: July 18, 2024 08:18 PM2024-07-18T20:18:44+5:302024-07-18T20:20:43+5:30
जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेश.
अलिबाग : माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे पर्यटनासाठी आलेल्या रील्स स्टार अन्वी कामदार हीचा रील्स करताना पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात रील्स बनवून जीव धोक्यात घालणारे स्टंट करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे आणि असे कोणी केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
पावसाळी पर्यटन जिल्ह्यात बहरत आहे. नदी, धरणे, धबधबे, जंगल भागात अनेक पर्यटक हे पावसाळी पर्यटनासाठी येत आहेत. मात्र निसर्गाचा आनंद घेताना काहीजण आपल्या हुल्लडबाजीमुळे, अती साहसी पणामुळे जीव गमावण्याच्या घटनाही घडत आहेत. नुकतेच मंगळवारी रील्स स्टार अन्वी कामदार हीचा कूंभे येथे दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी ही आपल्या पाच सहकारी सोबत पर्यटनास आली होती.
पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; रायगड जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी#Raigadpic.twitter.com/n37ydQZVtz
— Lokmat (@lokmat) July 18, 2024
कुभे येथील एका दरीच्या बाजूला असलेल्या कड्यावर अन्वी ही इंस्टाग्रामसाठी रील्स बनवत होती. मात्र हा तिचा शेवटचा रील्स ठरला. रील्स बनविण्याच्या नादात पाय घसरून ती ३०० फूट खोल दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. बचाव पथकाने तिचा मृतदेह शोधून रुग्णालयात दाखल केला. त्यांनतर ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रील्स बनवण्याच्या नादात अन्वी हिला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी असे साहसी कृत्य करून स्वतच्या जीवाला धोका निर्माण करीत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर रील्स बनवणे, साहसी कृत्य करणे याला बंदी असून जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशाचे पर्यटकांनी पालन करा, आदेशाची पायमल्ली केल्यास कडक कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पर्यटकांना केले आहे.