मल्लक स्पेशालिटीवर होणार कारवाई, जिते गावात निळ्या रंगाच्या धुळीचे प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:22 AM2018-01-12T05:22:18+5:302018-01-12T05:22:34+5:30
महाड औद्योगिक वसाहतीतून होणारे जलप्रदूषण चर्चेत असताना, शनिवार ६ जानेवारी रोजी महाड औद्योगिक वसाहतीतील जिते गाव परिसरात निळ्या रंगाच्या धुळीचे प्रदूषण समोर आले. जिते गाव परिसरात सर्वत्र निळ्या रंगाची धूळ पसरली होती. कोणत्याही वस्तूला हात लावला तर निळा रंग येत होता. यामुळे परिसरात घबराट पसरली होती.
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीतून होणारे जलप्रदूषण चर्चेत असताना, शनिवार ६ जानेवारी रोजी महाड औद्योगिक वसाहतीतील जिते गाव परिसरात निळ्या रंगाच्या धुळीचे प्रदूषण समोर आले. जिते गाव परिसरात सर्वत्र निळ्या रंगाची धूळ पसरली होती. कोणत्याही वस्तूला हात लावला तर निळा रंग येत होता. यामुळे परिसरात घबराट पसरली होती. नागरिकांनी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक वसाहतीकडे या प्रकरणी दाद मागितली. या प्रकरणाची दखल घेत निळ्या रंगाचे उत्पादन असलेल्या मल्लक स्पेशालिटी या कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून हा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, सर्वांचे लक्ष आता होणाºया कारवाईकडे लागले आहे.
महाड तालुका प्रदूषणमुक्त कधी होणार? हा प्रश्न मात्र सध्या महाडकरांना वारंवार भेडसावत आहे. औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीपासून प्रदूषणाचा जो त्रास महाडकरांवर ओढला आहे. त्याची कल्पना करता येत नाही. विविध आजार, शेतीचे नुकसान, येथील मुख्य आंबा पिकाचे नुकसान, मासेमारी संपली, असे अनेक उदरनिर्वाहाचे साधन महाडमधून संपले. शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आणि सतत्याने बसत आहे. तरी महाड तालुक्याचा प्रदूषण थांबवण्याचे नाव घेत नाही. दर वेळी वेगवेगळ्या प्रदूषणाच्या समस्यांना महाडकरांना तोंड देण्यास सामोरे जावे लागत आहे. वायुप्रदूषण, सोबत जलप्रदूषणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
सध्या खाडीपट्ट्या जलप्रदूषण जोरात असताना अचानक तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राजवळच असलेल्या जिते गावात शनिवार, ६ जानेवारी २०१८ रोजी निळा रंगाची धूळ सर्वत्र दिसू लागली. रस्ते निळे, घरे निळी, गाड्या निळ्या, जनावरे निळी त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी हात लागेल ती वस्तू निळी, तसेच नागरिकही निळे दिसू लागले. सुरुवातीला हा प्रकार काय आहे, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, काही काळानंतर ही धूळ निळ्या रंगाची असून जवळच असलेल्या रंग तयार करण्यासाठी निळा पिगमेंट तयार करणारी मल्लक स्पेशालिटी या कारखान्याची असल्याचे निष्पन्न झाले.
दरदिवशी महाडकर नागरिकांना प्रदूषणाच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने
सध्या महाडकर नागरिक चांगले संतापले असून, याचा कधीतरी
उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
१६ जानेवारी रोजी अचानक औद्योगिक क्षेत्रानजीक असलेल्या जिते गाव निळ्या रंगासारखा झाला. वाहन, रस्ते, जनावरे, घर तसेच नागरिकही ही निळे दिसू लागले. परिसरात एकच घबराट निर्माण होऊन खळबळ माजली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
२अचानक याच गावातील महमद बावा दरेखान व याचा मुलगा समीर महमद दरेखान या दोन्ही पितापुत्रांचा दम घुटून उलट्या होऊ लागल्या. यामुळे तर एकच खळबळ माजली. नागरिक सैरावैरा धावू लागले. नंतर नागरिकांनी पोलीस ठाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक क्षेत्राच्या कार्यालयात धाव घेतली.
३सर्व खात्यांच्या अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या गावातील अनेक ठिकाणचे निळ्या रंगाच्या धुळीचे तसेच जवळच असलेल्या मल्लक स्पेशालिटी या कारखान्या जवळचे धुळीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. मात्र, प्रथमदर्शनी पाहणीमध्ये ही निळ्या रंगाची धूळ जवळच असलेल्या रंग तयार करण्यासाठी निळ्या रंगाचे पिगमेंट तयार करणारी मल्लक स्पेशालिटी या कारखान्याची असल्याचे स्पष्ट झाले.
४यामुळे या कारखान्याविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड यांच्याकडून कायेदशीर कारवाई होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड प्रामेद माने यांनी दिली.
मोठ्या घटनेनंतर कारवाई होणार का?
जिते गावातील दोन नागरिकांना झालेल्या डस्टमुळे बाधा, हे पाहता सर्व गाव भीतीच्या वातावरणात आहे. ही रंगाची धूळ काय होती? यापासून यापुढे या गावात काही आजार पसरू शकतील का? अद्याप याची आरोग्य विभागाकडून तपासणी झालेली नाही. असे असताना या गावाची आरोग्य तपासणी, होणे गरजेचे आहे. जोपर्यंत याचा खुलासा होत नाही, तोपर्यंत या धुळीमुळे कोणते आजार उद्भवतील सांगता येत नाही.
मल्लक स्पेशालिटी हा कारखाना जिते गावापासून जवळपास १ किमी अंतरावर आहे. हा कारखाना एवढ्या निष्काळजीपणाने वागतो कसा? असे, एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. अशा निष्काळजीपणाने वागणाºया, नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाºया कारखान्यावर कठोर कारवाई होईल का? हा कारखाना बंद होईल का, असे अनेक प्रश्न भीतीच्या वातावरणात असलेल्या नागरिकांकडून केले जात आहे.
याअगोदर प्रदूषण करणारे अनेक कारखाने याच औद्योगिक क्षेत्रात आहेत. अनेक वेळा त्यांचे पितळ उघडे झालेले आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बंदची कारवाई होऊनदेखील आजही ते सुरू आहेत. त्यामुळे एवढी मोठी घटना या कारखान्याने केली असल्याने या कारखान्यावर कारवाई होईल का नाही. यावर जिते ग्रामस्थ संशय व्यक्त करीत आहेत.
घडलेली ही घटना छोटी नसून मल्लक या कारखान्याने केलेला हलगर्जीपणा जीवासाठी घातक आहे. या पसरलेल्या निळ्या रंगाच्या धुळीमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या पुढे या रसायनामुळे गावातील नागरिकांना कोणते आजार उद्भवतील हे सांगता येत नाही, अशा प्रकारच्या प्रदूषणाचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा जिते ग्रामस्थांमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- एजाज दरेखान,
माजी उपसरपंच जिते गाव
जिते गावच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर गावामध्ये जाऊन अनेक ठिकाणचे, मल्लक स्पेशालिटी कारखान्याच्या ठिकाणच्या निळ्या रंगाच्या धुळीचे नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी ही निळ्या रंगाची धूळ मल्लक या कारखान्याची असल्याचे निदर्शनास आल्याने या कारखान्यावर कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठ प्रादेशिक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- प्रमोद माने, उपप्रादेशिक अधिकारी,
प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड