रोहा : रोहा-अलिबाग रस्त्यावर यशवंतखार गावाच्या हद्दीत मध्यरात्री स्कॉर्पिओ गाडी घेऊन आलेले तीन चोरटे आणि ग्रामस्थांच्यात थरारनाट्य घडले. मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या टोळीचा पाठलाग यशवंतखारमधील ग्रामस्थांनी केल्याने हे चोरटे स्कॉर्पिओ गाडीतून घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती त्याचवेळी पोलिसांना देण्यात आली. या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.रोहे तालुक्यात गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करून चारचाकी वाहनातून मोकाट गुरे चोरणारी टोळी सध्या कार्यरत आहे. रोहा यशवंतखार येथे दोन दिवसांपूर्वी तिघे चोरटे विनानंबरची स्कॉर्पिओ घेऊन यशवंतखार नाक्यालगत संशयास्पद रीतीने उभे होते. हे गावातील एका व्यक्तीने बघताच त्याने तातडीने इतर ग्रामस्थांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. सात ते आठ ग्रामस्थ चोरट्यांना हुसकावून लावण्यासाठी नाक्यावर जमले.या चोरट्यांकडे धारदार शस्त्र असल्यास हल्ला होण्याच्या भीतीने त्यांचा पाठलाग न करता नाक्यावरच ठिय्या मांडून बसले. या ग्रामस्थांना बघून चोरट्यांनी आपली गाडी अलिबागच्या दिशेने पळविली. पुन्हा काही वेळाने हे चोरटे परत फिरून यशवंतखार येथे आले व रस्त्यालगत बसलेल्या मोकाट गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन स्कॉर्पिओत टाकून पळण्याच्या बेतात असताना या जागृत ग्रामस्थांनी त्या चोरट्यांच्या दिशेने धूम ठोकून एकच हल्लाबोल केला. ग्रामस्थ आपल्या अंगावर येत असल्याचे पाहताच या चोरट्यांनी स्कॉर्पिओ ग्रामस्थांच्या अंगावर घालून गाडीतून निडी गावाच्या दिशेने पळ काढला. याविषयाची माहिती तत्काळ पोलिसांना दिली गेली. (वार्ताहर)
मोकाट गुरे चोरणारी टोळी सक्रिय
By admin | Published: August 16, 2015 11:37 PM