सुनील तटकरे, अनंत गीते यांच्या विरोधातील गट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:35 AM2019-03-25T02:35:51+5:302019-03-25T02:36:01+5:30
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते या तुल्यबळ नेत्यांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते या तुल्यबळ नेत्यांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडून येण्यासाठी तयारीही सुरू केली आहे. त्याच वेळी दोन्ही उमेदवारांच्या विरोधातील नाराजांचे विविध गट सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करताना दोन्ही नेत्यांचे राजकीय कसब पणाला लागणार आहेत.
तटकरे यांना शेकाप आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तटकरे यांच्या मनातील विश्वास दृढ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप यांच्या मतांमुळे विरोधी उमेदवारांवर चांगलाच परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. तटकरेंविरोधात नाराज असलेल्या गटांकडे त्यांच्या राजकीय क्षमतेनुसार व्होट बँक आहे. विरोधकांनी प्रत्येक गाव आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून तटकरे यांच्या विरोधात मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे शेकापला आघाडीत स्थान दिल्याने अलिबाग तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तितकेसे रुचलेले नाही. त्यामुळे यातील काही नाराज हे तटकरेंच्या विरोधात मोर्चा खोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची प्रचिती काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीत काही प्रमाणात दिसून आली होती.
शेकापचे अलिबागच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वर्चस्वाचा फायदा तटकरे यांना होणार असला, तरी येथील नाराजी आताच्या अटीतटीच्या लढाईत निश्चितच परवडणारी नाही.
तटकरे यांच्याविरोधात काही प्रमाणात नाराजीचा सूर असतानाच गीते यांच्यावरही त्यांच्याच पक्षातील काही कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जाते. विकासकामांमध्ये वाटा न मिळणे, पदाधिकारी नियुक्तीमध्ये डावलले जाणे, मतदार संघातील कामे वेळेवर न होणे, शिवसेना नेते नव्याने आलेल्यांना मानसन्मान देताना जुन्यांकडे दुर्लक्ष करणे, अशा काही कारणांनी गीते यांच्याविरोधात नाराजीचा सूर असल्याचे दिसून येते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना नाराजांचे व्यवस्थापन करताना काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अशा नाराजांची संख्या वाढतच असते. त्यामुळे त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे आणि नाही, हे समजण्याइतपत तटकरे आणि गीते हे सुज्ञ आहेत.