पनवेल विधानसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:53 PM2019-04-24T23:53:38+5:302019-04-24T23:54:46+5:30
शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर; पारंपरिक मते विभागण्याची भीती
- वैभव गायकर
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडी अशी थेट लढत पाहावयास मिळत आहे. आघाडीमार्फत पार्थ पवार तर युतीच्या माध्यमातून श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभांना राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावत आहेत. मात्र, आता पनवेलमध्ये बहुजन वंचित आघाडीने प्रचारात जोर धरला आहे.
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी पनवेल ग्रामीण भागासह प्रचाराला सुरुवात केली आहे. एकट्या पनवेलमध्ये एकूण साडेपाच लाख मतदार आहे. पनवेल, उरण दोन्ही मतदारसंघात एकूण साडे आठ लाखांच्या आसपास मतदार आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पनवेलमध्ये सभा झाल्या. बहुजन वंचित आघाडीनेही आता पनवेलमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याने मागासवर्गीय व मुस्लीम मतदारांचा कल बहुजन वंचित आघाडीकडे वळू शकतो. विशेष म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील हे आगरी समाजाचे असल्याने आगरी समाजाची सहानुभूती म्हणून त्यांना आगरी समाजाची मते पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी बहुजन वंचित आघाडीला पसंती दिल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीला बहुजन वंचित आघाडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
२७ एप्रिल रोजी उरणमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खासदार असुद्दीन ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सध्या मावळमध्ये आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसून येत असली तरी बहुजन वंचित आघाडीची मते या दोघांपैकी एकाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणार हे मात्र नक्की आहे. मावळ, पिंपरी चिंचवडसारख्या घाटमाथ्यावर बहुजन वंचित आघाडीने जोरदार प्रचार केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पनवेल, उरण व खालापूरमध्ये जोरदार प्रचाराची रणनीती बहुजन वंचित आघाडीने आखली आहे.
उरणमध्ये ओवेसीची सभा
उरणमध्ये बहुजन वंचित आघाडीची शनिवारी २७ एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला खासदार असुद्दीन ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार असल्याने या सभेमुळे बहुजन वंचित आघाडीकडे मुस्लीम व मागासवर्गीय मतदारांचा कल वाढण्याची शक्यता आहे.