कोकण रेल्वेत लुटमार करणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 02:33 AM2016-04-16T02:33:16+5:302016-04-16T02:33:16+5:30
कोकण रेल्वे मार्गावर लूट करणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून मध्यरात्री प्रवासी झोपल्यावर रेल्वेची चेन खेचून गाडी थांबविली जाते आणि प्रवाशांच्या मौल्यवान सामानाची
रोहा : कोकण रेल्वे मार्गावर लूट करणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून मध्यरात्री प्रवासी झोपल्यावर रेल्वेची चेन खेचून गाडी थांबविली जाते आणि प्रवाशांच्या मौल्यवान सामानाची लूट केली जाते. या अनोळखी टोळीने दोन स्वतंत्र रेल्वेत प्रवास करणाऱ्या मुंबईतील चार कुटुंबीयांना लुटले आहे. हा प्रकार गुरु वारी मध्यरात्री घडला असून रोहा पोलीस ठाण्यात प्रवाशांनी तक्र ार दाखल केली आहे.
मागील दोन महिन्यांपासून कोकण रेल्वेत लुटमारी, चोरीचे प्रकार वाढत असल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाबू पनिचरी (५९, रा. मुकुंदनगर, मुंबई) व त्यांची पत्नी बिना (५५) कुटुंबीयांसमवेत कोचीवली - कुर्ला एक्स्प्रेसने केरळहून मुंबईकडे जात असताना रात्री १२.३० च्या दरम्यान गाडी रोहा रेल्वे स्टेशनजवळ क्रॉसिंगसाठी थांबली. यावेळी चोरट्यांनी पनिचरी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून नेली. तत्पूर्वी याच गाडीत वावरणाऱ्या चोरट्यांनी दुसऱ्या एका महिलेजवळील ३ हजार रोख व १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली.
दुसरी घटना मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये घडली. कणकवलीहून मुंबईसाठी येत असलेल्या पेडणेकर दाम्पत्याच्या साहित्याची चोरी झाली. हा प्रकार समजताच कोणीतरी चेन ओढली. रेल्वे काहीवेळाने थांबणार म्हणून या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले तर दुसऱ्या डब्यातील प्रवाशाजवळील मोबाइल व ८ हजार रोख रक्कम असे एकूण १६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.