रायगडमध्ये अदानी उद्याेग समूह उभारणार 171 कोटींची जेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:01+5:302021-02-10T08:08:47+5:30
एमसीझेडएमएने दिली परवानगी; शहाबाज संघर्ष समितीचा विरोध
रायगड : अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथे प्रस्तावित सिमेंट कारखान्यासाठी स्वतंत्र जेट्टी बांधण्यात येणार आहे. अदानी उद्याेग समूह यासाठी सुमारे १७१ काेटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी (एम.सी.झेड.एम.ए) कडून स्वतंत्र जेट्टी बांधण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र शहाबाज संघर्ष समितीने जेटीसह सिमेंट कारखान्याला विराेध केला आहे.
४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अदानी समूहाचा अलिबाग तालुक्यात शहाबाज येथे सिमेंटचा कारखाना प्रस्तावित आहे. या कारखान्यासाठी अदानी समूहाकडून कॅप्टिव्ह जेट्टी, कन्वेयर कॉरिडॉर आणि रस्ता बांधकाम करण्याची परवानगी मागण्यात आली होती.
हा रस्ता अंबा नदीवरून अदानीच्या जेट्टीकडे येणार आहे. सुरुवातीला शहाबाज येथे मोठ्या प्रमाणात खारफुटीची झाडे असल्याने दुसरी जागा निवडण्याचे सुचविण्यात आले होते.
नवी जेट्टी नौका किनाऱ्यावर लागण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. अदानी समूहाच्या या प्रकल्पासाठी जनसुनावणी २६ मार्च २०२० रोजी ठेवण्यात आली होती. परंतु कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने ही सुनावणी अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.
धरमतर खाडी किनाऱ्यावरील दोन हेक्टर जागा या जेट्टीच्या बांधकामासाठी निवडण्यात आली आहे, तर कन्वेयर कॉरिडॉर आणि रस्त्यासाठी खाडी काठावरील दिड हेक्टर जागेचा विचार करण्यात आला आहे. नव्या जेट्टीवर कोरडा माल उतरवला जाणार आहे. हा माल गुजरातवरून छोट्या पुरवठादार नौकांमार्फत शहाबाज येथे आणला जाईल. या बांधकामासाठी सुमारे १५० खारफुटीची झाडे तोडली जातील असा प्राथमिक अंदाज आहे. तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात दहा खारफुटीची झाडे लावली जाणार असल्याचे समाेर आले आहे.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही ‘जैसे थे’
याआधीही विविध प्रकल्पांनी स्थानिकांना नोकरीत सामावून घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही ‘जैसे थे’ असल्याने स्थानिकांकडून सातत्याने प्रकल्पांना विरोध होत असल्याचे दिसून येते. याच परिसरातून महामुंबई एससीझेड, रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवरसह अन्य कंपन्यांना हद्दपार केल्याचा इतिहास आहे.
खरेदी केली १३० एकर जमीन
अदानी उद्याेग समूहाच्या प्रस्तावित जेटी आणि सिमेंट कारखान्याला आमचा विराेध आहे. त्यांनी खासगी वाटाघाटीने सुमारे १३० एकर जमीन खरेदी केली आहे, तर अन्य एका सरकारी जमिनीवर त्यांचा डाेळा आहे. सदरची सुमारे १५० एकर जमीन शहाबाज ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे, असा दावा शहाबाज संर्घष समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ पाटील यांनी केला आहे.