भार्इंदर : शहरात दरवर्षीच्या गणेशोत्सवात मूर्तींचे वाढते प्रमाण पाहता विसर्जनाची समस्या गंभीर होत असल्याने त्याचे सुनियोजन होण्यासाठी ३० जानेवारीच्या महासभेत कनाकिया परिसरात अतिरिक्त जेट्टीच्या बांधकामाला मान्यता मिळाल्याने गणेश विसर्जनाला पर्याय गवसला आहे. पालिका हद्दीत गणेश विसर्जनासाठी भार्इंदर पूर्व व पश्चिम खाडीकिनारा, सुमारे ११ तलाव, चेना नदी, उत्तन सागरी किनाऱ्याची सोय सध्या उपलब्ध आहे. दरवर्षीच्या गणेशोत्सवात मूर्तींचे प्रमाण वाढत असल्याने त्यात सार्वजनिक मंडळांच्या उंच मूर्तींची संख्या तुलनेने अधिक असते. त्या सुलभ विसर्जनासाठी सध्या भार्इंदर पूर्व व पश्चिम खाडीकिनाऱ्यांवरील जेट्टींचा उपयोग होत असल्याने या दोन्ही किनाऱ्यांवर उंच मूर्तींच्या विसर्जनाचा प्रचंड ताण पडत असतो. सुमारे ४ वा. सुरू होणारे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत सुरू राहत असल्याने येथील यंत्रणा तोेकड्या पडून परिणामी तेथील कर्मचारीवर्गावर विसर्जन नियोजनाचा प्रचंड मानसिक ताण ओढवत असतो. हा ताण तसेच भक्तांची गर्दी व विसर्जनाचे नियोजन सुसह्य होण्यासाठी ३० जानेवारीच्या महासभेत भाजपाचे शरद पाटील यांनी कनाकिया परिसरातील खाडीकिनारी अतिरिक्त जेट्टी बांधण्याचा ठराव मांडला होता. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक भगवती शर्मा व ध्रुवकिशोर पाटील यांनी खाडीकिनारी असलेल्या हिरवळीवर संक्रांत येण्याची शक्यता वर्तवून जेट्टीच्या बांधकामाला तीव्र विरोध दर्शविला. या प्रस्तावित जेट्टीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्यानंतरच प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतरही त्यावर समाधान न झाल्याने ध्रुवकिशोर यांनी परस्परविरोधी ठराव मांडला. दोन्ही ठरावांवर पार पडलेल्या मतदानात शरद पाटील यांचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याने अतिरिक्त जेट्टीचा मार्ग सुकर झाला आहे. या जेट्टीसाठी पालिकेचा निधी खर्च करण्यात येणार असून बांधकाम मात्र मेरीटाइम बोर्डाकडून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
विसर्जनासाठी अतिरिक्त जेट्टीचा पर्याय
By admin | Published: February 02, 2016 1:41 AM