माहिती अधिकाऱ्यांचा पत्ता कट
By admin | Published: January 1, 2016 11:58 PM2016-01-01T23:58:05+5:302016-01-01T23:58:05+5:30
वाचन संस्कृती टिकून राहावी; त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.
- आविष्कार देसाई, अलिबाग
वाचन संस्कृती टिकून राहावी; त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. ३५ जिल्ह्यांत साजरा करण्यात येणारा ग्रंथोत्सव हा कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांकडून आता काढून घेण्यात आला आहे. वाचनाची चळवळ खेड्यापाड्यात खऱ्या अर्थाने पोचविणाऱ्या जिल्हा ग्रंथालयामार्फतच हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये विविध तारखांना ‘ग्रंथोत्सव १६’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. पालघर जिल्हा हा नव्याने निर्माण झाला असल्याने त्या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय सुरू झालेले नाही. त्यामुळे तेथे हा कार्यक्रम होणार नाही. राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव कार्यक्रम घेण्यास सुरुवात झाली. राज्यातील वाचन संस्कृती टिकून राहावी, प्रत्येकाला वाचनाची सवय लागावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्रंथालय उभारली आहेत.
राज्यात सुमारे १२ हजार ५०० च्या आसपास सरकारी ग्रंथालये आहेत. वाचनाची चळवळ, संस्कृती पिढीपर्यंत नेता यावी, यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ग्रंथोत्सव होय. हा ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालायामार्फत राबविला जात होता. मात्र सातत्याने ज्यांची नाळ वाचन संस्कृतीशी जोडली गेली आहे. त्या जिल्हा सरकारी ग्रंथालयांना ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे हे वाचनप्रेमींना सातत्याने खटकत होते.
याबाबतची वस्तुस्थिती ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ३ डिसेंबर २०१५ रोजी याबाबतचा सरकारी निर्णय सरकारने प्रसिद्ध केला. त्यानुसार आता जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून हा कार्यक्रम काढून घेऊन ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी त्या त्या जिल्हा ग्रंथालयावर देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकारी ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष राहणार आहेत, तर जिल्हा माहिती अधिकारी हे आता सदस्य असणार आहेत.
जिल्हा सरकारी ग्रंथालयामार्फत जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ग्रंथोत्सव पार पडणार आहे. वाचकांना एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच प्रकाशक आणि ग्रंथविक्रेता यांना एकाच ठिकाणी ग्रंथविक्रीसाठी जागा मिळावी, हा उद्देश आहे.
-किरण धांडोरे, संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई