९९ टक्के शाळा, अंगणवाड्यांना पुरेसे पिण्याचे पाणी
By निखिल म्हात्रे | Published: April 5, 2024 03:36 PM2024-04-05T15:36:55+5:302024-04-05T15:37:58+5:30
‘जलजीवन मिशन’नुसार जिल्ह्या २५० पेक्षा अधिक योजना पूर्ण
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जलजीवन मिशन कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील ९९ टक्के शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शाळांमधील मतदान केंद्रांनाही यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात ‘हर घर नल - हर घर जल अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत जलजीवन मिशनच्या २५० पेक्षा अधिक योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, उर्वरित प्रगतिपथावर आहेत. या योजनेअंतर्गत गावे वाड्यांबरोबर तेथील शाळांनाही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांबरोबरच शाळांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच स्वच्छतागृहांचीही गंभीर समस्या निर्माण झाली होती. शौचालयांचा वापर करता येत नव्हता. ही समस्या निकाली काढण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन योजनेतील पाण्याची जोडणी शाळांनाही देण्यात आली. त्यामुळे ज्या शाळांमध्ये पाणीसमस्या भेडसावत होती, ती निकाली निघाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार १५५ शाळा आणि ३ हजार ५१ अंगणवाड्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आता शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी तर उपलब्ध झाले असून, स्वच्छतागृहाचा वापर करणे सहज शक्य झाले.
मतदारांनाही सुविधा -
रायगड लोकसभा मतदार संघासाठी येत्या ८ मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात २ हजार ६९४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. बहुतांश केंद्रे ही शाळांमध्येच आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. निवडणुकीच्या काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शाळा आणि अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. केवळ ३ शाळा आणि २ अंगणवाड्यांचे पाणी पुरवठ्याचे काम शिल्लक आहे. ते एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. - संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग