आदगाव शाळा मंदिरात! सात वर्षांपासून दुरुस्तीची मागणी; प्रशासनाची दिरंगाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:12 AM2019-08-15T03:12:01+5:302019-08-15T03:12:47+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या मंदिरामध्ये भरत आहे. शाळेच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने, अजून किती दिवस शाळा मंदिरात भरणार, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.
- गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या मंदिरामध्ये भरत आहे. शाळेच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने, अजून किती दिवस शाळा मंदिरात भरणार, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.
आदगाव येथील शाळेचे पत्रे व कौलारू छप्पर वादळात उडून मोठे नुकसान झाले आहे. दुपारच्या सुट्टीमुळे शाळेतील विद्यार्थी बालबाल बचावले होते. शाळेला वाळवी लागल्याने ती धोकादायक बनली असून दुरुस्तीची मागणी गेल्या सात वर्षांपासून पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाकडून दुरुस्तीला चालढकल होत असल्याने आदगाव येथील मंदिरात पहिली ते चौथी अशी एकत्र शाळा भरवावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथीपर्यंतची जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे. विद्यार्थ्यांची एकूण ७० पटसंख्या असणाऱ्या शाळेला चार खोल्या आहेत. अचानक सुटलेल्या वादळी वाºयाने शाळेच्या चारपैकी तीन खोल्यांचे पत्रे व कौलारू छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये डिजिटल रूमची प्लॅस्टिक शेड फाटल्याने डिजिटल शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, शाळेचे संपूर्ण पत्रे व भिंतीची नासधूस झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना मंदिरात बसवले जाते. त्यामुळे आता लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती कशी होईल, असा प्रश्न शिक्षक व पालकांपुढे आहे.
वाळवी लागल्याने आदगाव शाळा धोकादायक बनली व छप्परामधील पूर्ण लाकूड वाळविणे बाधित आहे. त्यामुळे पावसाळी शाळा कायम गळकी असते. सातत्याने पाण्याने वर्ग व येथील डिजिटल शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा केव्हाही कोसळण्याची भीती कायम आहे. आदगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे शाळा कमिटी २०१३ पासून मागणी करत असताना मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आजतागायत दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे अजून किती दिवस शाळा मंदिरातच भरणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
पहिली ते चौथीची शाळा एकत्रच!
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गावदेवी मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होत असतात. यामध्ये एकत्रित पहिली ते चौथी वर्गातील ७० विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, या विवंचनेत शिक्षक आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेबाबत समस्या दूर कराव्यात, अशी मागणी उपसरपंच देवेंद्र मोरे यांच्यासह ग्रामस्थांकडून होत आहे.
शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही शाळा दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. अशा समस्यांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. ज्या शाळा स्पर्धेच्या युगामध्ये टिकत आहेत, अशा शाळांकडे दुर्लक्ष करणे फार मोठी चिंतेची बाब आहे.
- सुदेश मोरे, माजी व्यवस्थापक, शाळा समिती, अध्यक्ष, आदगाव
आदगाव शाळेच्या दुरुस्ती प्रस्तावानुसार मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप निधी वर्ग झाला नाही. निधी वर्ग झाला की लवकरात लवकर दुरुस्तीचे काम करण्यात येईल.
- नूरमहमद राऊत, गटशिक्षण अधिकारी, श्रीवर्धन