जिल्हा व कोकण विभागासाठी निधी प्राप्त करणार-आदिती तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:56 AM2020-01-10T00:56:35+5:302020-01-10T00:56:39+5:30

आज पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंतीदिनी त्यांना मानवंदना दिली.

 Aditya Tatkare will receive funds for the district and Konkan region | जिल्हा व कोकण विभागासाठी निधी प्राप्त करणार-आदिती तटकरे

जिल्हा व कोकण विभागासाठी निधी प्राप्त करणार-आदिती तटकरे

googlenewsNext

माणगाव : आज पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंतीदिनी त्यांना मानवंदना दिली. एक राज्यमंत्री म्हणून व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, ती पूर्णपणे यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. उद्योग, क्रीडा युवक कल्याण, खनिकर्म माहिती व प्रसारण, राजशिष्टाचार, फलोत्पादन या सर्व खात्यांची जबाबदारी स्वीकारत जिल्ह्याला व कोकण विभागाला जास्तीत जास्त निधी प्राप्त करणार असल्याचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव येथे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथम विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणणे मांडले.
शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे पार पाडेन. या जिल्ह्याची मुलगी म्हणून प्रामाणिक काम करण्याचा मी प्रयत्न करेन. महाआघाडीच्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन आपल्या जिल्ह्याचे प्रश्न येत्या पाच वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा माझा निश्चय आहे. प्रलंबित प्रकल्पाच्या बाबत थोड्याच दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतलेली आहे. सभागृहाच्या पहिल्याच दिवशी आमदार अनिकेत तटकरे व मी, आम्ही दोघांनी मिळून हा प्रश्न उपस्थित केला असून, रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम आम्ही करू व त्याबाबतचे निवेदन प्राप्त झाले असून येत्या १० दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात रखडलेल्या प्रलंबित प्रकल्पाबाबत बैठक आयोजित करणार आहोत. ज्या कारणांमुळे हे प्रकल्प रखडलेले असतील ते सोडवण्याचा आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करू, असे आश्वासन आदिती तटकरे यांनी
दिले.
या पत्रकार परिषदेप्रसंगी विधानपरिषद आ. अनिकेत तटकरे, उपसभापती राजेश पानावकर, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, संगीता बक्कम व नगर पंचायत सर्व सदस्या या वेळी उपस्थित होत्या.
>पर्यटनस्थळी सुविधा देणार
क्रीडा संकुलाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, अंदाजपत्रक मागील आठ दिवसांपूर्वी तयार केले आहे. येत्या महिनाभरात ते काम सुरू केले जाईल. प्रथम आपण क्रीडासंकुलात ज्या दुरुस्तीची गरज आहे, त्या कामांना प्राधान्य देणार असून त्यानंतर ज्या वाढीव कामांची गरज आहे तीही योग्यरीत्या केली जातील.
उपजिल्हा रुग्णालयाबाबत विचारणा केली असता शासकीय रुग्णालयात नव्याने काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्यासंदर्भात मंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला असून, अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाईल.
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आहेत, त्यांच्यामध्ये जी कमतरता जाणवते त्याची माहिती मागणार असून जी कमतरता, उणीव भासते व रिक्त पदे आहेत तीही भरण्यात येतील. गड-किल्ले, यात्रास्थळ, पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत येत्या दहा दिवसांत कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार आहोत. नाट्यगृहासंबंधी विचारले असता चार कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. त्यासाठी ज्या अजून निधीची गरज लागेल तो आणायची जबाबदारी खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेली आहे. पुढे त्यांना विळे-भागाड औद्योगिक क्षेत्राबद्दल विचारले असता त्या म्हणाले की, मागील काही दिवसांत ज्या घटना घडत आहेत त्या ठिकाणी त्या मूलभूत सुविधांची गरज आहे. त्यानुसार एमआयडीसीच्या स्वतंत्र बैठकीत स्थानिक नेत्यांना घेऊन नागरिकांनासोबत घेऊन त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू.

Web Title:  Aditya Tatkare will receive funds for the district and Konkan region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.