अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:04 PM2024-05-10T12:04:43+5:302024-05-10T12:05:19+5:30

 मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (९) उरण येथे संध्याकाळी उशिरा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Aditya Thackeray criticized on bjp | अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे

अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे

मधुकर ठाकूर 

उरण : लोकसभा निवडणुकीत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे. भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची आहे, असे आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उरणच्या जाहीर सभेततून केले.  मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (९) उरण येथे संध्याकाळी उशिरा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

उरण नगरपरिषदेच्या तिर्थरुप नानासाहेब धर्माधिकारी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर चांगलेच टिकेचे आसूड ओढले. दक्षिणेकडील राज्यांनी ठरवले आहे की भाजपला डोक्यावर बसवायचे नाही. उत्तर भारतातही बदल, परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे अब की बार ४०० पारची घोषणा करणारे भाजप चंद्रावरून की अमेरिकेतून कुठून ४०० पार करणार असा रोखठोक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणूकीत भाजप विरुद्ध भारत अशी लढाई आहे. संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. देश,महाराष्ट्र विरोधी भाजप आहे.त्यामुळे देशभरातील विविध राज्यात केंद्र सरकारचे अत्याचार वाढतच चालले आहेत.भाजपचे प्रज्वल रेवण्णा यांनी घरातील आणि पक्षातील हजारो महिलांचा अमानुषपणे छळ करुन बलात्कार केला.अशा रेवण्णाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते.मतदान झाल्यानंतर त्याला विदेशात पळून जाण्यासाठीही त्यांनी मदत केली असल्याचा गंभीर आरोपही आदित्य यांनी भाषणातून केला.

 २०२२ मध्ये गद्दारी, पक्ष फोडाफोडी करण्याच्या भाजपच्या गलिच्छ राजकारणा विरोधात लढत आहोत.गद्दारीने राज्याच्या सत्तेवर आलेल्यांमध्ये काही मंत्री भ्रष्टाचारांनी बरबरटले आहेत.उत्तर प्रदेशातही महाराष्ट्राप्रमाणेच पलटीराम निघाले आहेत . ३७० कलम रद्द करुनही काश्मीरमधील ना दहशतवाद संपला, ना पंडितांना चांगले दिवस आले ,ना भरभराट झाली. आज तिथे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे मात्र भाजपला निवडणुकीत उमेदवारही मिळाले नाहीत. ३०-४० हजार लोकेंद्रशासित लडाखमध्ये सामान्य जनतेला संघर्ष करावा लागत आहे.लडाखला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला.

गद्दारांना ५० खोके सामान्यांच्या बॅक खात्यात १५ लाख आले का.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का.पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळाली का.शेतकऱ्यांना लाभ मिळाला का.असे अनेक प्रश्न आदित्य यांनी भाषणातुन उपस्थित केले.आज देशात महागाई ,बेरोजगारी आणि महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.जिथे महिलांची संख्या अधिक तिथे विश्वासही अधिक त्यामुळे विश्वास तिथे विजय याकडेही आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेत लक्ष वेधले.

 दोन वर्षं  भाजप सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे.कधी पाहिले आहे का नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाजपने दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करताना.तसेच संभाजी नगरला विमानतळाला उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव केला होता.

मात्र अडीच वर्षे झाली भाजप सरकारने नाव दिले नाही.याच्याही पलिकडे जाऊन पाहिले तर गोव्यामध्ये  एअर पोर्टला मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले आहे. अयोध्येतील एअरपोर्टचे नाव वाल्मिकी एअरपोर्ट केले आहे.आमचा काही आक्षेप नाही.मात्र उत्तर प्रदेश, गोवा येथील विमानतळाचे नाव बदलले आहे.तर मग महाराष्ट्राने काय चुक केली आहे.नवीमुंबई विमानतळाला तुम्ही दि.बा. पाटील यांचे नाव का देत नाहीत. संभाजीनगरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज नाव का देत नाही.अशा महाराष्ट्र व्देषी भाजपाला या महाराष्ट्र व्देषी मिंधे सरकारला तुम्ही मतदान करणार का .हेच नाही तर आपले उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आहेत.त्यामुळे आता केंद्र सरकार बदलायचे आहे.महाराष्टातील तरुणांचा हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला नेणार तर आम्ही तुम्हाला नडणारच.त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन महाराष्ट्राचा, देशाचा अंधकार दूर करून टाका असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

Web Title: Aditya Thackeray criticized on bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.