बिरवाडी/महाड : राज्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आणणे, हेच आपले उद्दिष्ट आहे. केवळ विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक जिंकून हे लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यासाठी विधान परिषदेमध्येही संख्याबळ असणे आवश्यक आहे, त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात विजय संपादन करायचाच, या निर्धाराने प्रत्येक शिवसैनिकाने विधान परिषद उमेदवारांचा नियोजनबद्ध प्रचार सुरू करण्याचे आवाहन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महाड येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले.कोकण पदवीधर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला केंद्रीय मंत्री अनंत गीते, खा. अनिल देसाई, आ. भरत गोगावले, सदानंद थरवळ, कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवार संजय मोरे, अॅड. राजीव साबळे, उपजिल्हाप्रमुख बिपीन म्हामुणकर, जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.या निवडणुकीत शिवसेना १०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी या वेळेस व्यक्त केला. एकूण पदवीधर मतदारांपैकी ५० टक्के मतदारनोंदणी शिवसेनेने केली आहे. मात्र, कुठेही गाफील न राहता, प्रत्येक शिवसैनिकाने किमान २० मतदारांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी या वेळेस व्यक्त केली. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील चारही जागा शिवसेना जिंकेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवार संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण सभापती म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती या वेळी दिली. या विधान परिषदेत निवडणुकीत शिवसैनिक आणि युवा सैनिक हेच आपल्या प्रचाराचे प्रभावी माध्यम असल्याचे ते म्हणाले.
मेहनत घेतल्यास पदवीधर मतदार संघात विजय निश्चित - आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:48 AM