शासनाचे आदिवासी भवन कर्जतमध्येच व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:44 AM2018-05-01T02:44:59+5:302018-05-01T02:44:59+5:30
आदिवासी विकास विभागाअंतर्गत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी क्षेत्र कर्जत तालुक्यात आहे. त्यामुळे शासनाने कर्जत तालुक्यात आदिवासी भवन उभारावे
कर्जत : आदिवासी विकास विभागाअंतर्गत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी क्षेत्र कर्जत तालुक्यात आहे. त्यामुळे शासनाने कर्जत तालुक्यात आदिवासी भवन उभारावे, अशी मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केली. रायगड जिल्हा आदिवासी कला, संस्कृती महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल ४५ गावातील आदिवासी नृत्य महोत्सवात सादर झाले.
कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्या वतीने मार्गाची वाडी येथे दोन दिवसीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा समारोप कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बुधाजी हिंदोळा, दादा पादिर, रायगड जिल्हा अध्यक्ष वामन ठोंबरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष सोनू जाधव, आयोजक कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी, युवक कार्यकर्ते भास्कर दिसले, कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली.
आदिवासी महोत्सवात नाचणी, वरी, तांदूळ यांच्या भाकरी सोबतीला उडदाचे पीठ, पाट्यावरची चटणी, करवंदे यांचा ठेचा, आंबा-करवंदे यांचे लोणचे असा मेनू असलेला आदिवासी बचत गट यांचा स्टॉल सर्वांना खेचून घेत होते. महोत्सवातील दोन दिवसात रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल ४५ आदिवासी मंडळांनी पारंपरिक नृत्ये सादर केली. त्यात महिलांनी धामडी नाच, हंगामा नाच, गौरी नाच, बाल्या डान्स, भोंडाई नाच, टाळ्या नृत्य यांच्यासह महिला जात्यावर, मुसळावर धान्य दळताना गाणी गाण्याचे काम केले. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचा प्रकल्प विभाग आहे. कातकरी समाजासाठी स्वतंत्र आश्रमशाळा शासनाने मंजूर केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आदिवासी संघटनेला दोन एकर जमीन बक्षीस पत्र देणारे मंगल केवारी यांचा सत्कार महोत्सवात करण्यात आला.