प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रशासनाची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:52 PM2019-09-16T23:52:57+5:302019-09-16T23:53:04+5:30
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता ही सेवा अशी मोहीम राबवण्यात येणार आहे.
अलिबाग : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता ही सेवा अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील गाव आणि शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन हा सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लॅस्टिकमुक्त भारत करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालय प्लॅस्टिकमुक्त झाले पाहिजे. प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरु वात केली तरच याचा परिणाम दिसून येईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. या उपक्र माच्या जनजागृतीसाठी एस.टी.बस स्थानकामध्ये जिंगल्स, होर्डिंग्जद्वारे प्रसिध्दी देण्यात यावी. नगरपरिषदांनी आपल्या नगरपरिषदेजवळ एक संकलन सेंटर तयार करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सरकारी, निमशासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ‘आशा’ वर्कर्स यांनीही २ आॅक्टोबरपासून प्लॅस्टिक व्यवस्थापन कार्यक्र माची सुरु वात करावी. आपण या अभियान संदर्भात जी काही कार्यवाही कराल त्याचे छायाचित्र व माहिती पोर्टलवर अपलोड करावी. बचतगटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उपलब्ध करु न घेऊन त्यांनाही नगरपरिषदेजवळ कापडी पिशव्यांचे स्टॉल लावण्यास सूचित करावे, असे त्यांनी सुचवले. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घर प्लॅस्टिकमुक्त झाले पाहिजे यासाठी या उपक्रमाची व्यापक प्रसिध्दी होणे आवश्यक आहे. या मोहिमेच्या प्रचार आणि प्रसिध्दीसाठी ग्रामपंचायतीने लोकांच्या प्रबोधनासाठी दवंडी, पोस्टर, पॉम्पलेटद्वारे आवाहन करावे, दुकानदारांना नोटिसा बजावणे, व्यापाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करु न त्यांना प्लॅस्टिक बंदीबाबत सूचना कराव्यात असेही ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
>लोकसहभागाच्या माध्यमातूनही हा उपक्र म अधिकाअधिक यशस्वीरीत्या राबवण्यासाठी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनाही या मोहिमेत सहभागी करु न घ्यावे. रेल्वे स्थानकावरही फ्लेक्सद्वारे उपक्र माची प्रसिध्दी करावी. प्लॅस्टिक संकलनासाठी श्रमदान मोहीम घेऊन यामध्ये नागरिक, विद्यार्थी, बचतगट प्रतिनिधी, विविध समित्यांचे सदस्य, गावपातळीवरील सरकारी कर्मचारी, शेतकरी, व्यावसायिक, कर्मचारी संघटना आदींना सहभागी करु न त्यांच्या मदतीने श्रमदान मोहीमही राबवावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.