- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणावर गेल्या तीन वर्षांपासून वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. या धरणात शुक्रवारी सायंकाळी तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. यानंतर प्रशासनाने कर्जतमधील सोलनपाडा धरणासह तालुक्यातील धबधब्यांवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. सोलनपाडा धरणावर दरवर्षी बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. मात्र, प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. प्रशासनाने आधीच धरणांवर बंदी घातली असती तर पर्यटकांचा जीव वाचला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुंबई-पुणेच्या मध्यवर्ती ठिकाणावर कर्जत तालुक्यात वर्षासहलीतून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात; परंतु येथील धरण व धबधब्यांवर स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कायमच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. पर्यटकांची संख्या आणि येथे होणारी पर्यटकांची हुल्लडबाजी आणि बेशिस्तपणामुळे प्रत्येक वर्षी पर्यटक बुडून मृत्यू पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेवर स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता, सोलनपाडा धारणासह तालुक्यातील अन्य धबधबे वर्षासहलीसाठी पर्यटकांना बंद केले आहेत. एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली की, तालुक्यातील संपूर्ण पर्यटनस्थळे बंद करून, स्थानिक प्रशासन तालुक्यातील पर्यटन व्यवसायावर किंबहुना पर्यटकांच्या आनंदावर विरजन घालण्याचे काम करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोलनपाडा धरणावर पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी धरणावर दुर्घटना घडल्यानंतर सोलनपाडा धरणावर जमावबंदी आदेश काढून बंद केले होते. यंदा पावसाला सुरु वात झाल्यावर, पर्यटकांचा ओघ सुरू झाला होता. गेल्या वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती यावर्षीही होऊ नये, म्हणून स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. शुक्रवारी सोलनपाडा धरणावर तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाने हे धरण पुन्हा पर्यटनासाठी बंद केले. जर का प्रशासनाने हे धरण याअगोदर बंद केले असते किंवा सुरक्षिततेच्या योजना केल्या असत्या, तर या तीन पर्यटकांचा मृत्यू झाला नसता, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्यावर उपाययोजना न करता ते कायमस्वरूपी बंद करून प्रशासन आपत्कालीन व्यवस्थेतून मागे पडल्याचे यातून दिसून येत आहे. कर्जत तालुक्यातील धरण आणि धबधब्यांवर जमावबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यावर या संदर्भात कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून केली जाईल,- दत्ता भडकवाड, उपविभागीय अधिकारी कर्जतकर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण आणि धबधब्यांवर ६ जुलै रोजी जमावबंदी आदेश लागू करण्याचे ठरविले असून, ७ जुलैपासून २ महिने हा आदेश जारी करताना १४४ (१) लागू केला आहे. तशा प्रकारचे सूचना फलक अजून धरण आणि धबधब्यांवर लावण्यात आले नाहीत; परंतु हे फलक लावण्याचे काम आजपासून सुरू करण्यात येणार आहे. सोलनपाडा धरणावर कर्जत पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी लक्ष केंद्रित करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. - जालिंदर नालकूल, पोलीस उपविभागीय अधिकारी, कर्जत- बंदी घालण्यापेक्षा सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करावी व कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळे ही सुरक्षित करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाची दिरंगाई पर्यटकांच्या जीवावर
By admin | Published: July 09, 2017 2:06 AM