अनेक मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासनाची होतेय दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 12:36 AM2020-06-14T00:36:31+5:302020-06-14T00:37:07+5:30
पंचनामे, मदत, पुनर्वसन, दैनंदिन कामे अडली
अलिबाग : कोकणात निसर्ग वादळाने थैमान घालून प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. नुकसानीच्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना अद्यापही मदत पोहोचण्यात अडथळा येत आहे, तर दुसरीकडे मंत्री आणि नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचे चांगलेच पेव फुटले आहे. प्रशासनाला सातत्याने त्यांच्या दिमतीला उभे राहावे लागत असल्याने महत्त्वाची कामे मागे पडत असल्याचे चित्र आहे.
३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगलेच नुकसान केले आहे. नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. लाखो नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे, तर हजारो घरांवरील छप्पर उडाले आहे. कोणी आपल्या कुटुंबातील माणूस गमावला आहे. चक्रीवादळाने माजवलेल्या नुकसानीची भयानकता फार मोठी आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याला वादळानंतर तातडीने सुरुवात केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र अद्याप १० दिवस होत आले तरी मदत पोहोचण्यात अडथळा येत असल्याचे दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४ जून रोजी अलिबाग येथे १०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. सदरची मदत तातडीची असली तरी प्रत्यक्षात ती ११ जून रोजी संबंधित जिल्ह्यांकडे वर्ग करण्यात आली.
दरम्यानच्या कालावधीमध्ये कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. आज एक मंत्री, नेता आला तर दुसºया दिवशी अन्य नेता जिल्ह्यात येत आहे. परंतु मंत्री, नेत्यांच्या पाहणी दौºयामुळे अख्खी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या दावणीला बांधावी लागत असल्याचे दिसून येते. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाºयांपर्यंतचे सर्व महसूल अधिकारी, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अशा सर्वच कर्मचारी आणि अधिकारी यांना त्यांच्या मागे धावावे लागत आहे. त्यामुळे पंचनामे करणे, मदत, पुनर्वसन करणे, मान्सूनपूर्व तयारी, कोरोनाचा मुकाबला आणि दैनंदिन कामे पडून राहत आहेत. ती पूर्ण करताना अधिकारी आणि कर्मचाºयांची कमालीची दमछाक होत असल्याचे दिसून येते.
यांनी दिली भेट
आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मत्स्य व बंदर मंत्री अस्लम शेख, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री, नेत्यांनी येथे भेट दिली आहे.पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे हे जिल्ह्यातील असल्याने ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.