पाणी योजना राबविताना जिल्ह्यात प्रशासनाची दमछाक; तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:52 PM2021-02-21T23:52:43+5:302021-02-21T23:52:50+5:30
तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त : टंचाईवर उपाय करताना अडचणी
अलिबाग : एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे पाणी टंचाईवर उपाययोजना करणाऱ्या विभागांमध्येच रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते सहायक आवेदक अशी तांत्रिक संवर्गातील तब्बल १०४ पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळेच रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर कायमची मात्रा मिळविण्यात आणि पाणी योजना राबविण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासनाला जंग पछाडावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाची अवस्था बिकट आहे. या विभागासाठी ६४ पदे मंजूर आहेत. या पदांपैकी एकही पद भरलेले नाही. या रिक्त पदांमध्ये कार्यकारी अभियंता१, उपकार्यकारी अभियंता १, उप अभियंता स्थापत्य ८, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ४, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उपविभाग ८, आरेखक १ आणि कनिष्ठ आरेखक १ यांचा समावेश आहे.
रा. जि. प.च्या ग्रामीण पुरवठा विभागामध्ये ७५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी केवळ ३५ पदे भरण्यात आली आहेत. ४० पदे रिक्त आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी १, कार्यकारी अभियंता १, उपअभियंता स्थापत्य ४, उपअभियंता यांत्रिकी १, सहायक भूवैज्ञानिक १, कनिष्ठ भूवैज्ञानिक २, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ३, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग १५, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ३, आरेखक १, संगणक १, वायू सांपडिक चालक २, रिंगमन १, जॅक हॅमर ड्रिलर २ आणि सहाय्यक आवेदक २ यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि विज्ञानावरील जनतेची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे.