नवीन तलाठ्यांकडे गावाचा कारभार
By निखिल म्हात्रे | Published: January 31, 2024 05:14 PM2024-01-31T17:14:04+5:302024-01-31T17:14:28+5:30
सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याला सुरुवात करण्यात आली आहे.
अलिबाग - मागील काही दिवस प्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आता निवड झालेल्यांसह प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे. जिल्ह्यात 218 जागांसाठी तलाठी भरती झाली होती. रायगड जिल्ह्यात 218 जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज आले होते. पैकी 218 जणांची निवड यादी आणि 135 उमेदवारांची प्रतीक्षा यादी 6 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यात 13 आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य 23 जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात तलाठी पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच, एकाच तलाठ्याला चार गावांचा कारभार पहावा लागत होता. त्यामुळे संबंधित तलाठी वैतागून गेले होते. तलाठीपदाची भरती करावी, अशी सातत्याने मागणी होत होती. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी राजस्व सभागृहात सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड अशा विविध कागपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी दिली.
काही उमेदावार हे उशिरा दाखल झाले होते. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी होणार का नाही, अशी चिंता त्यांना सतावत होती. मात्र, हजर असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.