रायगड : जिल्ह्यातील महत्वांच्या कंपन्यांमध्ये कोरोनाने शिरराव केला आहे. रिलायन्स, जेएसडब्ल्यू, सुदर्शन यासह अन्य काही कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. मात्र प्रशासन जाणून बुजून कंपन्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांनी केला आहे.
अलिबाग आणि पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. कोरोनाबाबतचे नियम धाब्यावर बसवत असल्याने तेथे प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तातडीने जेएसडब्ल्यू कंपनीने कामकाज बंद करावे अशी मागणीही पाटील यांनी केली.
नागोठणे येथील रिलायन्स तसेच सुदर्शन कपंनीतील वाढती रुग्ण संख्या नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासन फक्त बैठका घेत आहे. ग्राऊंडवर त्याचे काम दिसत नाही. त्यामुळे आपल्याला कोणीच वाली नसल्याची धारणा संबंधीत ग्रामपंचायतींची झाली आहे. प्रशासनाच्या अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, तसेच कंपनीच्या बाबतीमध्ये बोटचेपे धोरण घेत असल्यानेच त्यांची हिंमत वाढली असल्याचे पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. प्रशासनाने आता याबाबात ठोस उपाय योजना करावी अन्यथा आम्हाला या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
मंगळवारी पेझारी, आंबेपूर परिसरातील कर्मचारी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कंपनीपेक्षा लोकांचे जीव महत्वाचे असल्याचे सांगत सुरक्षित काम करता येत नसेल तर काही काळासाठी कंपनी बंद ठेवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कोरोना झालेले कामगार हे कंत्राटी आहेत, त्यांच्याशी कंपनीचा संबंध नसल्याचा पवित्रा कंपनी व्यवस्थापनाकडून घेतला जातो. रिलायन्स, सुदर्शनसह अन्य कंपन्यांमधील कामगार कोरोना पॉझिटीव्ह असतील तर त्यांची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या माहितीपत्रात दिली जाते. मात्र जेएसडब्ल्यूचे नाव कुठेही येणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचा आरोप होतो आहे.या आरोपांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दखल घेत संबंधीत यंत्रणांना निर्देश देण्यात येतील असे त्यांनी दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे.