पनवेल : पनवेल तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान सुट्टीचे दिवस वगळून दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पनवेलच्या पंचायत समितीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजीव मांडे यांनी दिली.उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज महा-ई-सेवा केंद्र अथवा अन्य संगणकीय यंत्रणेद्वारे भरून त्याची प्रत काढून घ्यावी व नंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण अर्ज दाखल करायचा आहे. सर्व २४ ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी २४ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज २४ तास भरता येणार आहे. या अर्जासोबत ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला, उमेदवार ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचा, ग्रामसेवक यांचा दाखला, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र अथवा शौचालय वापराबाबत ग्रामसभेच्या ठरावासह प्रमाणपत्र, अपत्यांचे घोषणपत्र, (१२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य नसावे), निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक पासबुक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चालेल, अनामत रक्कम भरल्याची पावती, मालमत्ता व दायित्व घोषणा पत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत घोषणा पत्र, जात वैधता प्रमाण पत्र किंवा जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती असे दाखले, प्रमाणपत्र जोडून त्यावर आवश्यक तेथे सह्या करून सदर परिपूर्ण उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावयाचा आहे.
१५ जानेवारीला मतदान शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक असेल तेथे मतदान घेण्यात येणार आहे. सोमवार, १८ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.