महिला पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:56 AM2020-06-08T00:56:40+5:302020-06-08T00:57:09+5:30

माणुसकीचे दर्शन : रस्त्यावरील अडथळे दूर करूनगर्भवतीला वेळेत पोहोचवले रुग्णालयात

Admirable performance of women police | महिला पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी

महिला पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी

Next

निखिल म्हात्रे

अलिबाग : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने मोठी नासधूस केली. अनेक घरे जमीनदोस्त झाली, विजेचे खांब, झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ते बंद झाले. यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. अशी स्थिती असली तरी पोलीस मात्र आपले कर्तव्य खंबीरपणे बजावताना दिसून आले. एवढेच नाही तर माणुसकीदेखील जपली आहे. असेच माणुसकीचे दर्शन श्रीवर्धनमध्ये पोलीस नाईक असलेल्या आरती राऊत यांनी घडवले. वादळानंतर सारे उद्ध्वस्त झालेल्या, पडझड झालेल्या रस्त्यावरील अनेक अडथळे दूर करून त्यांनी एका गर्भवती महिलेला दवाखान्यात पोहोचवले.

आपत्तीकाळात माणसे हतबल होतात. त्या संधीचा फायदा घेत चढ्या भावाने माल विकणारे खेडोपाडी लोकांनी अनुभवले. असे असताना पोलीस नाईक आरती राऊत यांनी वादळात वाशी-तळा गावातील एका गर्भवती महिलेला स्वत:च्या गाडीने दवाखान्यात पोहोचवून पुन्हा एकदा वर्दीतली माणुसकी दाखवून दिली. रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी चक्रीवादळाचा इशारा दिला होता. जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाणी ही समुद्रकिनारी आहेत. चक्रीवादळामुळे मालमत्तेचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची किनारपट्टीला शक्यता अधिक होती. त्यामुळे सागरी पोलीस ठाण्यांना जादा कुमक दिली गेली होती व बंदोबस्त लावला होता. रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक आरती राऊत यांना श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे नेमण्यात आले होते.
४ जून रोजी आरती राऊत या त्यांचे पती मंदार राऊत यांच्या सोबत त्यांच्या खासगी वाहनाने तळामार्गे श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे बंदोबस्ताकरिता जात होत्या. त्या तळा येथील वाशी या गावात आल्यानंतर काही महिला रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्यांनी पाहिल्या. वाहन थांबवून त्या महिलांकडे चौकशी केली असता त्यापैकी एक महिला गर्भवती असल्याचे व तिला बाळंतपणाच्या कळा चालू असल्याची माहिती त्यांना समजली.
महिलेस रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्या गावातून वाहन उपलब्ध नसल्याचे तेथील महिलांनी सांगितले. रुग्णालय गाठणे आवश्यक होते. राऊत यांनी क्षणाचाही विलंब न लावता गर्भवती महिला व त्यांचे दोन नातेवाईक यांना स्वत:च्या वाहनात बसवून म्हसळा दिशेने निघाल्या.

म्हसळा येथे जात असताना रस्त्यामध्ये असलेले अडथळे दूर करीत म्हसळा येथे गेल्या. त्या ठिकाणी या गर्भवती महिलेस रुग्णालयात दाखल केले. गर्भवती महिलेस वेळीच उपचार मिळाल्याने महिला व बाळ सुरक्षित आहेत.
 

Web Title: Admirable performance of women police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.