विद्यार्थ्यांचे जनजागृती पथनाट्य, मानव अधिकाराबाबत आदिवासींचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:48 AM2017-12-16T03:48:48+5:302017-12-16T03:49:01+5:30
मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र व रायगड पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथील रायगड जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालयात मानव अधिकार जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग : मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र व रायगड पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथील रायगड जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालयात मानव अधिकार जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी वाड्यांमधील जनतेत मानव अधिकारांबाबत जनजागृती व्हावी, तसेच त्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती व्हावी याकरिता हे पथनाट्य प्रभावी ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी या वेळी व्यक्त केला.
मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत पुरी यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात पाली-सुधागड व परिसरात सुरु असलेल्या उपक्रमांबाबत या वेळी विवेचन केले. पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मानव अधिकारासंबंधी उद्बोधक माहिती प्रात्यक्षिकासह दिली.
या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, सहा. प्रा. अमोल महाजन, सहा. प्रा. प्रवीण घुन्नरव, पथकातील विद्यार्थी कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत पुरी यांच्या नेतृत्वाखालील या चमूने ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. २० वर्षांपूर्वी पाली-सुधागड परिसरातील आदिवासीवाड्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करीत असतानाच्या आठवणींना डॉ. चंद्रकांत पुरी यांनी उजाळा दिला. आदिवासीं वरील एक अन्याय प्रकरणात स्थानिक पोलीस तक्रार दाखल करून घेत नव्हते. एका पत्रकाराच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक माधवराव कर्वे यांच्याशी संपर्क साधल्यावर, त्यांनी तत्काळ वायरलेस मेसेज दिल्यावर हललेली स्थानिक पोलीस यंत्रणा, तेथील पोलीस निरीक्षकांची तत्काळ गडचिरोली येथे झालेली बदली हा संवेदनशील प्रसंग होता, असे त्यांनी सांगितले.