कुपोषित बालकांना ‘रोटरी’ने घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:39 PM2019-09-23T22:39:51+5:302019-09-23T22:40:02+5:30
औषधोपचाराची स्वीकारली जबाबदारी; कर्जतमधील अतितीव्र कुपोषित ४५ बालकांना देणार पोषण आहार
कर्जत : कर्जत तालुका कुपोषणग्रस्त ओळखला जातो. या तालुक्यात असलेले कुपोषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जात आहेत. मात्र तरीदेखील ४५ बालके ही अतितीव्र कुपोषित असून त्यांच्यासाठी शासनाने कर्जत ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू केले आहे. रोटरी क्लबच्या कर्जत शाखेने कर्जत तालुक्यातील अतितीव्र कुपोषित असलेली सर्व ४५ बालके यांची जबाबदारी स्वीकारली असून त्यांना दत्तक घेतले आहे. त्या सर्व बालकांच्या पोषण आहाराची आणि औषधोपचार यांची जबाबदारी स्वीकारल्याने भावी काळात तालुक्यातील कुपोषण कमी होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या बाल उपचार केंद्रात १३ बालके दाखल आहेत. कर्जत तालुक्यात कुपोषण प्रश्नावर काम करणाऱ्या दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाºया पोषण सेवांवर देखरेख प्रकल्पामार्फत केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि रायगड जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली होती. सध्या या बालउपचार केंद्रात १३ तीव्र कुपोषित श्रेणीतील बालके उपचार घेत आहेत. या सर्व बालकांना पूरक पोषण आहार आणि इतर आवश्यक मदत करण्याचे आवाहन दिशा केंद्रामार्फत केले जात आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत रोटरी क्लबच्या बाल उपचार केंद्रात दाखल असलेल्या १३ बालकांना चादर, साबण, तेल, पेस्ट, ब्रश या सह शेंगदाणे लाडू, राजगीरा लाडू, चिक्की या सह कोरडा आहार वाटप करण्यात आला. त्या सर्व १३ आणि तालुक्यातील एकूण ४५ कुपोषित बालकांची जबाबदारी कर्जत रोटरीच्या वतीने घेण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील सर्वच कुपोषित बालकांना रोटरी क्लबच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब कर्जतचे प्रमुख हुसेन जमाली यांनी दिली. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांचे उपस्थितीत रोटरी क्लब कर्जतचे अध्यक्ष हुसेन जमाली यांच्यासह रोटरी क्लब सदस्यांसह एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर, दिशा केंद्राचे कार्यकर्ते आणि पोषन हक्क गटाचे समन्वयक अशोक जंगले आदी उपस्थित होते. त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पुरी यांनी रोटरीकडून कुपोषित बालके दत्तक घेण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
आपण स्वत: वैद्यकीय सेवा करतो, पण मला ज्या वेळेस कुपोषित मुलांना मदत करण्याची संधी मिळते त्या त्या वेळी तातडीने मदत करण्याचे मान्य केले आहे. रोटरी क्लबवतीने आपण औषधे उपलब्ध करून दिली आहेत, यापुढे देखील आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल आणि यापुढेही शक्य होइल तेवढी मदत देखील करू.
- डॉ. मनोहर साबणे, रोटरीयन
रोटरीच्या वतीने तालुक्यातील ४५ कुपोषित बालकांना आम्ही आमची सामाजिक बांधिलकी समजून दत्तक घेतले आहे. सर्वच बालकांना आमच्या वतीने वस्तुरूपी मदतीसह आरोग्य सेवा देण्याचा सुध्दा आमचा प्रयत्न असेल. सीटीसी संपल्यानंतरसुध्दा गावोगावी जाऊन पालकांचे मेळावे घेऊन कुपोषणाच्या विरोधी जनजागृती केली जाईल.
- हुसेन जमाली, अध्यक्ष,
कर्जत रोटरी क्लब