पोलादपूरमध्ये ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ पंधरवडा
By admin | Published: May 25, 2017 12:20 AM2017-05-25T00:20:44+5:302017-05-25T00:20:44+5:30
पोलादपूर तालुक्यातील शेतकरी समृद्ध आणि शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी तालुका कृषी कार्यालय प्रयत्नशील असून, उन्नत शेती समृद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील शेतकरी समृद्ध आणि शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी तालुका कृषी कार्यालय प्रयत्नशील असून, उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवड्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विजय पांढरे यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यात १ मे ते ८ जून २०१७पर्यंत शेतकरी कार्यशाळांचे आयोजन करण्याचा संकल्प तालुका कृषी कार्यालयामार्फत हाती घेण्यात आला असून, आतापर्यंत कापडे बुद्रुक, सडवली, बोरघर, मोरिगरी, ताम्हाणे, गोळेगणी, पळचिल, मोरसडे, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, देवळे, माटवण, वझरवाडी, चरई या गावांमध्ये शेतकरी बैठकांद्वारे विविध योजनांची माहिती, ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ पंधरवड्यानिमित्त देण्यात आली. यामध्ये पिकांची उत्पादकता वाढ, पीकनिश्चिती, पीककर्जापेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न घेणे, शेतीमालाला बाजारपेठ, काढणीपश्चात तंत्रज्ञान, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण आदी माहिती या वेळी तालुका कृषी अधिकारी पांढरे यांनी दिली.
येत्या २५ मे ते ८ जून या, ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ पंधरवड्यानिमित्त गावनिहाय प्रशिक्षण, कृषी सहायकांमार्फत प्रत्येकी २ पीक प्रात्यक्षिके, गावनिहाय कृषी वार्ताफलक, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन, तालुक्यातील एकत्रित शेतकरी प्रशिक्षण व कार्यशाळा पोलादपूर शहरातील कॅप्टन विक्र मराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, प्रगतशील शेतकऱ्यांचे मनोगत आणि नवनवीन तंत्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याचे पांढरे यांनी सांगितले.
येत्या डिसेंबर २०१७ अखेरीस कृषी विभागाच्या वेबसाइटद्वारे ठिबक सिंचनाच्या लाभार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, इच्छुकांनी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन पांढरे यांनी केले आहेत.