महाड : रायगड विकास प्राधिकरणाने महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर) नागपूर या संस्थेकडून किल्ले रायगड आणि प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या एकवीस गावांचे एरियल मॅपिंग करून घेतले आहे. या एरियल मॅपिंगमुळे किल्ले रायगडचे त्रिमितीय चित्रीकरण, परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधांची चांगल्या प्रकारची उपलब्धता करून देणे शक्य होणार असल्याची माहिती प्रधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजीराजे यांनी आज महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या एरियल मॅपिंगमुळे गड आणि प्रधिकरणाच्या एकवीस गावांमधील साधन-संपत्तीचे निश्चितीकरण, गडाचे त्रिमिती छायाचित्रण आणि योग्य प्रकारे संवर्धन करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गड आणि गड परिसरात व्यवसाय करणाऱ्या ज्या व्यावसायिकांची नोंद पुरातत्व विभागाकडे आहे, त्यांना प्राधिकरणामार्फत मोफत गाळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा खा. संभाजीराजे यांनी यावेळी केली. गडावर जगदिश्वर मंदिराशेजारी त्याचप्रमाणे हत्तीचा माळ येथे अशा दोन पोलीस चौक्या बांधण्यात येणार आहेत.