घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोना काळात जार नको
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 12:43 AM2021-05-05T00:43:37+5:302021-05-05T00:44:18+5:30
नागरिकांकडून आराेग्याला प्राधान्य; यंदाच्या उन्हाळ्यात उद्याेग मंदावला
निखिल म्हात्रे
अलिबाग : मागील महिनाभरापासून जिल्ह्यत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. याचा फटका जार विक्रेत्यांनाही बसला आहे. अनेकांनी जार बंद केल्याने जार विक्रीची संख्या घटली आहे. त्यामुळे आता जार विक्रेतेही अर्थिक संकटात आले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या या लाटेत जास्त आहे, तसेच ६० पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे मृत्यूही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती असल्याने बाहेरील वस्तू घेण्यास ते नकार देत आहेत, तसेच ज्यांच्याकडे नियमित जार येत होते त्यांनीही सुरक्षिततेच्या कारणामुळे जार बंद केले आहेत. त्यामुळे जार विक्रेत्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. शहरात परवानाधारक जार विक्रेते किती आहेत याबाबत विविध यंत्रणांमध्ये संभ्रम आहे. काहीच जारधारकांकडे परवाने असल्याची माहिती मिळाली आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे लग्न समारंभ व इतर कार्यक्रम बंद होते, तसेच यंदाच्या लगीनसराईच्या तोंडावर कोरोनाचा उद्रेक झाल्याने समारंभांवर बंधने आली आहेत. अशा कार्यक्रमात जार पुरविणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत घरोघरी नियमित जारचा पुरवठा करणारे विक्रेते कमी आहेत. मात्र, त्यातही अनेकांनी जार बंद केल्याने विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.
२५ प्रकल्पांची नोंद
जिल्ह्यात ६० पेक्षा जास्त पाण्याच्या जारचे प्रकल्प आहेत. त्यामध्ये परवानाधारक विक्रेत्यांची संख्या कमी आहे. केवळ २५ विक्रेत्यांकडे परवाना असल्याची माहिती मिळाली. जार प्रकल्पासाठी आधी नगररचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागत होती. आता मात्र तो नियम रद्द झाल्याची माहिती मिळाली. परवानगीची प्रक्रिया सोपी झाल्याचेही सांगण्यात आले. आता जार प्रकल्पासाठी जिल्हा परिषद अथवा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, एकूण प्रकल्पांच्या तुलनेत परवानगी असलेल्या विक्रेत्यांची संख्या अतिशय अल्प आहे.
अलिबाग, पेण, रोहा, उरणमध्ये सर्वाधिक प्रकल्प
शहरात सर्वाधिक पाण्याचे जारचे प्रकल्प अलिबाग, पेण, रोहा, उरण भागात आहेत. तेथून ते जिल्ह्यात जारचा पुरवठा करतात, तसेच ग्रामीण भागातही जारचा पुरवठा करतात. प्रकल्पाच्या ठिकाणी जार घ्यायला येणाऱ्या ग्राहकांकडून ५ ते १० रुपये कमी घेत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागत आहे. मागील वर्षापासून जार विक्री करण्याचा हंगाम पूर्णपणे बुडाला आहे. कोरोना संसर्ग येण्यापूर्वी व्यवसाय चांगला सुरू होता. त्यानंतर मात्र सतत नुकसान होत आहे. लग्न समारंभ व तापमानवाढीमुळे उन्हाळ्यात जारची अधिक विक्री होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मोठ्या ऑर्डर रद्द झाल्या आहेत, तसेच नियमित जार घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे.
- विवेक पाटील, पाणी विक्रेता
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत आहोत, तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळत आहोत. पाण्याचा जार घेऊन येणारी व्यक्ती किती काळजी घेते त्याबाबत माहिती नसल्याने सध्या पाण्याचा जार घेणे बंद केले आहे.
- किरण पाटील
बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. घरात वयोवृद्ध आई-वडील असल्याने अधिक काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे बंद केले आहे, तसेच बाहेरून वस्तू घेणे टाळत आहोत. त्यामुळे पाण्याचा जारही बंद केला आहे.
- सुजीत घरत