गणेश चोडणेकर आगरदांडा : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. मुरूड शहरातील भंडारवाडा येथे राहणारी दोन मुले रत्नागिरी येथे नातेवाइकांकडे अडकली होती. मुरूडचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या प्रयत्नामुळे त्यांची आई-वडिलांशी भेट झाली. तब्बल ३६ दिवसांनंतर मायलेकरांची भेट झाली.मुरूड शहरातील भंडारवाडा येथे राहणाऱ्या अस्मी समीर तोडणकर यांची दोन मुले रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथे आपल्या आत्याकडे गेली होती. ते लॉकडाउनमुळे अडकले. नऊ वर्षांचा रुद्र आणि अकरा वर्षांचा स्वयम ही मुले आज-उद्या जाता येईल म्हणत वाट बघत होती. मात्र, आधी २१ दिवस असलेली टाळेबंदी पुन्हा वाढली. त्यानंतर तर दोन्ही मुले आई-वडिलांच्या आठवणींनी रडू लागली. मोबाइलवरून एकमेकांशी संपर्क होत असला तरी मुलांचे आईला भेटल्याशिवाय समाधान होत नव्हते. त्यामुळे अखेर मुरूड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना पोलीस अधीक्षकांच्या नावाने अर्ज करण्यास सांगून त्यांना आॅनलाइनसाठी मदत केली. त्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयाशी संपर्क साधून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यास अपेक्षित यश आले आणि गेले ३६ दिवस आईच्या भेटीसाठी आतुर झालेल्या त्या दोन्ही मुलांना मुरूड येथे आणण्याची परवानगी मिळाली.
३६ दिवसांनंतर झाली मायलेकरांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:07 AM