पनवेल : खांदा वसाहतीमधील आदिवासी वसतिगृहात ३१ आॅगस्टपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले होते. पेण प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांचे निलंबन ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी होती. या उपोषणादरम्यान अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली. अखेर नवव्या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांनी परीक्षा असल्याचे आमरण उपोषणाला स्थागिती दिली. खांदा वसाहतीमधील आदिवासी वसतिगृहातील २१२ विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांची बदली करावी या व इतर मागण्यांकरिता आमरण उपोषण सुरु केले होते. सुकापूर येथील आदिवासी वसतिगृहातील ७२ विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले होते. या उपोषणाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली त्यांना जे जे रुग्णालय, पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची देखील भेट घेवून विद्यार्थ्यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले नाही. लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात येईल अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. मात्र प्रशासनाचे उपोषणाकडे दुर्लक्ष व येवू घातलेल्या परीक्षा पाहता हे आमरण उपोषणाला स्थगिती देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घेतला. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई हे उपस्थित होते. या आमरण उपोषणाला विद्यार्थ्यांच्या परीक्षा व ढासळलेली प्रकृती पाहता स्थगिती देण्यात आली आहे. आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी प्रतिक्रिया सुनील तोटावड या उपोषणकर्त्या विद्यार्थ्याने दिली. (प्रतिनिधी)
अखेर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
By admin | Published: September 11, 2015 1:46 AM