बाल्मर लॉरी व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 07:38 PM2023-09-26T19:38:15+5:302023-09-26T19:39:03+5:30
व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
मधुकर ठाकूर, उरण : भेंडखळ येथील बाल्मर लॉरीतील कामगारांच्या धरणे आंदोलनानंतर आणि कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने ताळ्यावर आलेल्या कंपनी व्यवस्थापनाने १५ पैकी १२ कामगारांना याआधी देण्यात येत असलेल्या वेतनावर कामावर घेण्याची तयारी दर्शवली आहे.व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
भेंडखळ येथील बाल्मर लॉरी कंपनीत कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेल्या १५ ऑपरेटर कामगारांना नव्याने आलेल्या ठेकेदारांनी याआधी देण्यात येत असलेले वेतन देण्यास नकार दर्शविला होता.त्यानंतर कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर १५ पैकी ७ कामगारांनाच जुन्या वेतनाप्रमाणे वेतन देण्याची तयारी दर्शवली होती.मात्र व्यवस्थापनाच्या निर्णयाशी कामगार सहमत नव्हते. तसेच व्यवस्थापनही कामगारांना याआधी प्रमाणे वेतन देण्यास तयार नव्हते.यामुळे दोघांत संघर्ष निर्माण झाला होता.
या संघर्षानंतर कामगारांनी न्याय हक्कासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती.कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर वठणीवर आलेल्या व्यवस्थापनाने मंगळवारी (२६) चर्चा केली.अखेर महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने १५ पैकी १२ कामगारांनाच जुन्या वेतनाप्रमाणे वेतन देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली आहे . तसेच उर्वरित ३ कामगारांचा निर्णय
चर्चा करून मार्ग काढू असे चर्चेअंती ठरले आहे. त्यामुळे कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात असल्याची माहिती कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिली.