‘अगस्त लोप’ सरल्याने होड्या निघाल्या किनाऱ्याकडे, चार महिने मासेमारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:13 AM2019-05-16T00:13:29+5:302019-05-16T00:13:42+5:30
मच्छीमार बांधव १५ मे रोजीचा ‘अगस्त लोप’ हा योग सरल्यामुळे या कालावधीनंतर आपल्या होड्या समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरवत नाहीत.
- आविष्कार देसाई
अलिबाग : मच्छीमार बांधव १५ मे रोजीचा ‘अगस्त लोप’ हा योग सरल्यामुळे या कालावधीनंतर आपल्या होड्या समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरवत नाहीत. त्यामुळे होड्या किनाºयावर शाकारण्यासाठी परप्रांतीय कामगारांची एकच लगबग सुरू आहे. पावसाच्या कालावधीमध्ये पुढील चार महिने मासेमारी करता येणार नाही यासाठी सुट्टीवर जाण्याआधी हातातील काम संपवण्यामध्ये हजारो तरु ण व्यस्त झाल्याचे चित्र सध्या अलिबाग तालुक्यातील वरसोली कोळीवाड्यातील समुद्र किनाºयावर पाहावयास मिळत आहे.
वरसोली गावचे रहिवासी असलेले आणि तीन होडींचे मालक असलेले गणेश आवारी यांचा पूर्वापार मासेमारीचा व्यवसाय आहे. गेले आठ महिने सागराच्या लाटांशी झुंज देत आपला जीव धोक्यात घालून होड्या आता तब्बल १५ दिवसांनी हळूहळू किनारी लागत होत्या. आवारी यांच्या दोन होड्या १४ मे रोजी रात्री किनाºयावर आल्या तर, एका होडीने सकाळी किनारा गाठला होता. होडीतून सर्व मासे, साहित्य उतरवल्यावर होडीच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आली. होडीवर मासेमारी करण्यासाठी मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश आणि बिहार प्रांतातील तरुण कामाला असल्याचे दिसून येत आहे. त्यांनीही काम संपवण्यावर भर दिला होता कारण त्यांनाही आता पुढील चार महिने सुट्टी मिळणार होती. त्यामुळे त्यांच्या चेहºयावर आनंद दिसून आला. एकमेकांना बिहारी भाषेत कामाच्या सूचना देत लवकर काम संपवायला सांगताना दिसत होते.
होडीतून सर्व सामान खाली करण्यात आले. मासेमारीसाठी लागणाºया जाळीचा ताबा गणेश आवारी यांनी आंध्र प्रदेशमधून कामानिमित्त आलेल्या धनुष्य याच्यासह अन्य सहकाऱ्यांकडे दिला. तंबू वजा झोपडीमध्ये सुमारे बाराशे मीटरच्या जाळ््याचा ढीग घेऊन ही सर्व मंडळी बसली. भल्या मोठ्या जाळीचे पदर सात ते आठ जणांनी ओढत, त्यातील फाटलेल्या ठिकाणी शिऊन त्याची वीण घट्ट करण्याच्या कामात व्यग्र झाले. जाळी शिवताना त्यांचे हात इतक्या शिताफीने भराभर चालत होते, असे वाटले एखाद्या यंत्रानेच त्या जाळीला शिवायला घेतले आहे. जाळी विणण्याचे काम जोरदार सुरू होते तर, दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटातील सुमधुर गाणी कानावर पडत होती. ती गाणी गुणगणताना जाळी विणण्याच्या कामाला गति आली होती. अधूनमधून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे धनुष्य, कृष्णा, डीजे, तेजस हे तरुण देत होते.
एकमेका साहाय्य करू
‘गाव मे कोई काम नही होता. खेती-बाडी भी नही है, इधर अच्छे पैसेभी मिलते है’ असे, धनुष्य सांगत होता. ‘एक आदमी को काम आता है, तो हम और लडकोंको भी सिखाते है, असे तेजसने आवर्जून सांगितले. यातून त्यांची एकमेकांना मदत करणाºया प्रवृत्तीचे दर्शन झाले, शिवाय आपल्या गावातील तरुणाच्या हाताला काम मिळावे ही भावनाही त्यांच्या मनात असल्याचे दिसून आले. थोड्याच दिवसांमध्ये ते सर्व मुंबईमार्गे आंध्रप्रदेशला रवाना होतील. चार महिने आपल्या परिवारासोबत राहून पुन्हा नव्या उमेदीने सागराचे आव्हान पेलण्यासाठी ते सज्ज होतील.
परप्रांतीय कामगारांची संख्या अधिक
१जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेले हे तरुण कामाच्या शोधामध्ये इकडे आले होते. पर्सनेटची जाळी विणण्यामध्ये ते अतिशय माहीर समजले जातात. यंत्राची वीण आणि त्यांनी बांधलेली वीण ओळखणे अवघड आहे.
२महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्यासारखे कारागीर शोधून सापडत नसल्याचे बोटीचे मालक गणेश आवारी यांनी सांगितले. त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आठ महिने काम केल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते आपापल्या गावी परत जातात. त्यानंतर नारळी पौर्णिमेच्या काही दिवस आधी ही मंडळी पुन्हा कामावर न चुकता हजर होतात.
३जिल्ह्यामध्ये सुमारे अडीच हजारांच्या आसपास यांची संख्या आहे, तर उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारांची संख्या तीस ते चाळीस हजारांच्या आसपास आहे. गावाकडे विशेष काम नसते शिवाय येथे मोठी रक्कम मिळत असल्याने ते परत येतातच. हे सर्व गटा-गटांनी एकाच ठिकाणी काम करतात. काही ठिकाणी हे वर्षभरासाठी काम करतात तर काही ठिकाणी दिवसाच्या मजुरीवर काम करतात. दिवसाला सुमारे सातशे ते आठशे रुपये त्यांच्या खिशात पडत असल्याचे आवारी यांनी स्पष्ट केले.