जयंत धुळप / अलिबागः नागाव समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेले कोपरखैरणेमधील तीन तरुण समुद्रात बुडाले असून त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. फक्त पाचच मिनिटांसाठी समुद्रात उतरतो, असं म्हणून हे तिघं गेले आणि परतच आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसलाय. नियतीचा खेळ अनाकलनीय असतो, हेच या घटनेनं पुन्हा स्पष्ट झालंय.
नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील सेक्टर १४, १५, १७ आणि १८ येथे राहणारे १३ मित्र मिनी बसने काल संध्याकाळी नागावला पोहोचले होते. हे सर्वजण फुटबॉल खेळाडू होते. त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षकही पिकनिकला गेले होते. नागावचा किनारा पाहून सगळ्यांनाच समुद्रात उतरण्याचा मोह झाला होता, पण संध्याकाळ झालेली असल्यानं प्रशिक्षकांनी त्यांना थांबवलं. अंधारात समुद्रात न जाण्याचा सल्ला स्थानिक मंडळींनीही सगळ्यांना दिला. पण, आम्ही पाचच मिनिटांत जाऊन येतो, असं म्हणत चैतन्य किरण सुळे (२०), आशिष मिश्रा (२४) आणि सुहाद सिद्दगी (२१) या तिघांनी समुद्रात धाव घेतली. त्यानंतर रात्रभर हे तिघं परत न आल्यानं इतरांनी पोलिसांत धाव घेतली.
या तिघांना शोधण्याचं काम सकाळी सुरू झालं, तेव्हा आशिष मिश्राचा मृतदेह कोर्लई किनाऱ्यावर आणि सुहासचा मृतदेह आग्राव किनाऱ्यावर सापडला. मच्छिमारांच्या मदतीने पोलीस चैतन्यचा शोध घेत आहेत.