नेरळ : नेरळ गावात सध्या आत्मदहनाचा विषय गाजत असून, ज्येष्ठ नागरिकांनी उपोषण केल्यानंतरहीआपले प्रश्न सुटत नाहीत, म्हणून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी २० जून रोजी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत संघर्ष समितीचे कार्यकर्ते सभात्याग करून निघून गेल्याने अर्धवट राहिली. मात्र, त्याच वेळी रस्त्याचे फुटपाथ फेरीवालामुक्त करण्यात आल्याने रोजगार बुडालेले फेरीवाले यांनीदेखील आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे नेरळमधील वातावरण तापले असून, आत्मदहन करण्याचा इशारा ज्या कारणांसाठी देण्यात आला आहे, त्यातील नेरळ ग्रामपंचायत संबंधित विषय मार्गी लागले असल्याचा दावा ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे.नेरळमधील ज्येष्ठ नागरिक १ जुलै रोजी आत्मदहन करणार असून, सप्टेंबर २०१८ मध्ये उपोषण करताना मागण्या पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण झाले नाही म्हणून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार नेरळ ग्रामपंचायतीने माथेरान रस्त्यावरील फुटपाथवर आक्रमण करून व्यवसाय करणारे सर्व फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे मागील तीन दिवसांपासून नेरळमधील फुटपाथ फेरीवाला मुक्त झाले आहेत. तर नेरळ बाजारपेठमधील रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी टोइंग गाडी आणली आहे. नेरळ पोलीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर लावलेल्या दुचाकी वाहनांना उचलून नेरळ पोलीसठाण्यात नेत आहेत. त्यामुळे नेरळ बाजारपेठ वाहतूककोंडीमुक्त बनत आहे. त्यानंतर १ जुलैला संभाव्य आत्मदहन करण्याचा इशारा देणारे नेरळ संघर्ष समिती यांची बैठक नेरळ ग्रामपंचायत येथे २० जून रोजी लावण्यात आली होती. त्या बैठकीला उपोषणकर्ते यांच्या विषयांशी संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.गटविकास अधिकारी बी. एस. पुरी यांनी ग्रामविकास अधिकारी गुडदे यांना कामकाज सुरू करण्यास सांगितले. मात्र, संघर्ष समितीकडून अधिकारी आले नसल्याचे कारण पुढे करून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघर्ष समितीच्या विविध १२ मागण्यासंबंधी असलेले सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्यास सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले नाहीत म्हणून संघर्ष समितीने काहीही चर्चा न करता सभेतून निघून जाणे पसंत केले आणि नंतर १ जुलै रोजी आपले कार्यकर्ते आत्मदहन करतील, अशी घोषणा संघर्ष समितीचे अध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी केली. त्यानंतर गटविकास अधिकारी पुरी यांनी सर्व १२ विषयांवर सखोल चर्चा केली. त्यात नेरळ ग्रामपंचायतीबरोबर संबंधित असलेले बाजारपेठ वाहतूककोंडी, उघड्यावर मासळीविक्री, फुटपाथ मोकळे करणे, शून्य कचरा मोहीम, डम्पिंग ग्राउंड, गुरचरण जमिनी याबाबत समाधानकारक काम नेरळ ग्रामपंचायतीने केले असल्याचे स्पष्ट केले.फु टपाथ मोकळेझाल्याने नागरिक समाधानीसंघर्ष समितीने फुटपाथ मोकळे करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीवर दबाव टाकत असल्याचा आरोप फेरीवाले आणि टपरीवाले यांनी केला आहे. गेले तीन दिवस फुटपाथवर व्यवसाय केले जात नसल्याने त्या सर्व फेरीवाल्यांनी नेरळ ग्रामपंचायत गाठली. त्यांनी संघर्ष समितीमुळे आमच्या व्यवसायावर गदा येत असेल तर आम्हीदेखील उद्यापासून पुन्हा व्यवसाय सुरू करू, असा इशारा देणारे निवेदन दिले आहे. त्याच वेळी आपल्याला नेरळ विकास प्राधिकरण बांधत असलेल्या व्यापारी संकुलात जागा द्या, अन्यथा आपणदेखील आत्मदहन करू, असा इशारा देणारे पत्र नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहे. मात्र, या सर्वच घडामोडीत नेरळ गावातील रस्ते हे वाहतूककोंडीच्या बाहेर आले असून, दुसरीकडे फुटपाथदेखील मोकळे झाले आहेत.
संघर्ष समिती पाठोपाठ नेरळमध्ये फेरीवाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:42 AM