आविष्कार देसाईरायगड : दिवाळीनंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आराेग्य यंत्रणेने वर्तविली हाेती. जिल्ह्यातील काेराेनाच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास कोरोना रुग्णांत वाढ हाेत असल्याचे स्पष्ट हाेत आहे. यातील गंभीर बाब म्हणजे महानगरीला अगदी खेटून असणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये काेराेनाचा झपाट्याने फैलाव हाेत असल्याने आराेग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून काेराेनाने जिल्ह्यात घातलेल्या धुमाकुळाला ऑक्टाेबर महिन्यात काही अंशी ब्रेक लागला हाेता. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली हाेती. तसेच मिशन बीगिन अगेन अंतर्गत सरकार आणि प्रशासनाने मंदिर, शाळा, संग्रहालये, आंतर जिल्हा बसेस, पर्यटन स्थळे यांच्यासह अन्य घटकांना परवानगी दिली हाेती. त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली हाेती. नागरिकांनी काेराेनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. त्यामुळे काेराेनाचा प्रसार हाेण्यासाठी पाेषक वातावरण तयार झाले, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वाढत्या रुग्णसंख्येला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
दिवाळीनंतर १८ मृत्यूजिल्ह्यात दिवाळीनंतर नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याने काेराेना वाढीला पाेषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे काेराेना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ हाेत आहे. दिवाळीनंतर फक्त नऊ दिवसांमध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे दिवसाला सरासरी दाेन रुग्णांचा मृत्यू झाला.
दिवाळीनंतर नागरिकांनी माेठ्या संख्येने गर्दी केली. काेराेनाचे नियम त्यांनी पाळलेले नसल्यानेच काेराेनाचा फैलाव हाेत आहे. नागरिकांनी सातत्याने आराेग्य त्रिसुत्रीचे पालन करावे. कुटूंबातील सदस्यांची प्रत्येकाने काळजी घ्यावी. काेणताही आदार अंगावर काढू नये.- डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकीत्सक, रायगड
पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्ण वाढण्याचे कारणपनवेल महापालिका हा भाग मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांच्या जवळ आहे. अनलाॅकनंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने नागरिक कामानिमित्त प्रवास करीत आहेत. काेराेनापासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर यांसारख्या उपाययाेजनांना नागरिक केराची टाेपली दाखवत असल्यानेच काेराेनाचा संसर्ग हाेत आहे. अनेक जण कोरोना नियमांचे पालन करत नाहीत.