चार वर्षांनी ती पुन्हा सौभाग्यवती; अन् मुलालाही मिळाले बाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:30 AM2023-05-23T10:30:42+5:302023-05-23T10:30:51+5:30
अलिबागच्या महिलेचा नव्याने संसार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पूर्वी पतीच्या निधनानंतर पत्नीला संपूर्ण आयुष्य विधवा म्हणून काढावे लागत होते. रूढी परंपरांनी जखडलेले तिचे संपूर्ण आयुष्य जणू नरकच असे. तिच्यावर अनेक बंधने असत. मात्र, आता काळ बदलला आहे. विधवांचा पुनर्विवाह होतोय, त्यांनाही समाजात मानाचे स्थान मिळतेय. अशाच एका अलिबागच्या विधवा महिलेचा पुनर्विवाह झाल्याने तिचा संसार नव्याने फुलणार आहे. विशेष म्हणजे, पदरात ११ वर्षांचा मुलगा असताना, तिला पुण्यातील व्यक्तीने स्वीकारले आणि ती पुन्हा सौभाग्यवती झाली, तसेच तिच्या मुलालाही बाबा मिळाले.
अलिबागमधील ऋतिका या विधवा महिलेशी पुण्यातील प्रतीक याने विवाह केला असून, तिच्या अकरा वर्षांच्या मुलालाही दत्तक घेतले आहे. त्यामुळे ऋतिकाचा संसार पुन्हा सुरू होणार आहे. भाजपचे रायगड उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने हा विवाह सोहळा संपन्न झाला. ऋतिका हिचा २०११ साली राजेश पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना सोहम हा मुलगा झाला. मात्र, २०१५ साली राजेश जग सोडून गेले. घरची परिस्थिती बेताची असूनही तिने सोहमला शिक्षण दिले.
असे ठरले लग्न : पुण्याच्या भोसरी येथील प्रतीक महादेव भागवत याच्याशी ऋतिकाची ओळख झाली. ऋतिकाचा स्वभाव आवडल्याने प्रतिक यांनी लग्नासाठी मागणी घातली. या दोघांचा किशोर भातखंडे यांनी विवाह लावला. तर सोहम याला रीतसर दत्तक दिले. दोघांची रजिस्टर विवाह नोंदणी ॲड.सुनील केशव वाकडे यांनी केली.