अखेरचा पेपर देऊन ‘ती’ चढली बोहल्यावर! आदिवासी पाड्यातील तरुणीची जिद्द
By राजेश भोस्तेकर | Published: April 14, 2023 06:11 AM2023-04-14T06:11:53+5:302023-04-14T06:12:01+5:30
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आदिवासी समाजातील एका तरुणीने आगळा आदर्श कृतीतून घालून दिला आहे.
अलिबाग :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आदिवासी समाजातील एका तरुणीने आगळा आदर्श कृतीतून घालून दिला आहे. घरातल्या मंडळींचा आग्रह डावलून पदवीची परीक्षा देईपर्यंत विवाह न करण्याचा निश्चय पूर्ण करून दाखविला. गुरुवारी दुपारी टीवायबीकॉमचा अखेरचा पेपर संपला आणि २ वाजता ती बोहल्यावर चढली.
अलिबागच्या मैनुशेट वाड्याजवळ श्रीगाण या आदिवासी पाड्यावरील जेएसएम कॉलेजची विद्यार्थिनी प्रगती संतोष नाईक हिचा विवाह झाला. परिसरात पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारी ती पहिलीच आहे. संतोष नाईक हे मोलमजुरी करतात. प्रगतीच्या शिक्षणासाठी सुहास म्हात्रे व अनुजा म्हात्रे यांनी सहकार्य केले .
प्रगतीला पुढचे शिक्षण घेण्यास आपली आडकाठी नसेल, असे प्रगतीच्या पतीने म्हटले आहे. परिक्षेपूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, ॲड. गौतम पाटील व उपाध्यक्षा, डॉ. साक्षी पाटील आदींनी तिला आशीर्वाद दिला.
आदिवासी समाजातील एक मुलगी आमच्या महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून स्वत:ची प्रगती करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी व वैवाहिक आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. - ॲड. गौतम पाटील,
अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, अलिबाग