स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांपासून अंधारात असलेली हुतात्मा नाग्या कातकरी प्रकाशाने उजळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 07:09 PM2023-12-30T19:09:15+5:302023-12-30T19:09:28+5:30
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त करून अधिकाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली होती.
मधुकर ठाकूर
उरण : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांपासून अंधारात असलेली हुतात्मा नाग्या कातकरी यांची चिरनेरमधील ३० कुटुंबांची चांदायली आदिवासीवाडी शनिवारी (३०) प्रकाशमान झाली असल्याची माहिती उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवले यांनी दिली. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील हुतात्मा नाग्या कातकरी यांची चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंब ७५ वर्षांपासून अंधारात चाचपडत होती. चांदायली आदिवासी वाडीपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. वीजेचे पोलही टाकण्यात आले होते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त करून अधिकाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली होती. तसेच दंडात्मक कारवाईपोटी वीजमंडळाला २० हजार रुपये दंड भरावा लागला.त्यानंतर मात्र वनविभागाची परवानगी घेऊन काम करण्यात आले असल्याची माहिती सोनवले यांनी दिली.
त्याचबरोबर चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल,उपसरपंच सचिन घबाडी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी कार्यकर्ते अमर कातकरी, राजू कातकरी, भरत कातकरी ,यशवंत कातकरी, महेंद्र कातकरी, जयवंत कातकरी, सुधीर कातकरी यांनीही वीज पुरवठा करण्यासाठी उरण वीज महामंडळाचे मुख्य अभियंता विजय सोनवले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सर्वच अडथळे दूर करून चांदायली आदिवासी वाडी पर्यंत ६ लाख ७५ रुपये खर्च करून २१ वीजेचे पोल टाकण्यात आले आहेत.पोल टाकण्यात आल्यानंतर शनिवारी (३०) संध्याकाळपासून चांदायली आदिवासी वाडीवर वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवले यांनी दिली. चांदायली आदिवासी वाडी ७५ वर्षांनंतर प्रकाशाने पहिल्यांदाच उजळली निघाली आहे. त्यामुळे येथील आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.