साराच्या मृत्यूनंतर झोपलेले प्रशासन जागे; अधिकाऱ्यांना अलिबागला बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 10:00 AM2023-07-28T10:00:09+5:302023-07-28T10:00:19+5:30
जिते गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सारा हिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
पेण : एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठविल्याने फरपट झालेल्या सारा रमेश ठाकूर हिचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच झोपी गेलेले प्रशासन जागे झाले आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, पेण तालुका आरोग्य अधिकारी, तसेच जिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत चौकशीसाठी अलिबाग येथे बोलावले होते.
जिते गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सारा हिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मे महिन्यात बालकांना शासनाकडून दिलेल्या एमआर लसीचे डोस प्रकरण ताजे आहे. पाच बालकांच्या दंडावर लस दिलेल्या जागेवर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे पालकांनी आंदोलन छेडले होते.
पेण रुग्णालयासमोर उद्या आंदोलन
सारा ठाकूर हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठीचे निवेदन जिते ग्रामस्थांतर्फे पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना गुरुवारी देण्यात आले आहे. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उद्या, शनिवारी उपजिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करून जिते गावातील ग्रामस्थ रोष व्यक्त करणार आहेत. सारावर योग्य उपचार झाले असते, तर ती वाचली असती. आरोग्य यंत्रणेची अनास्था तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.