कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी २६ जानेवारीपर्यंत रस्ता न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही ‘आदिवासींची वाट बिकट’ असल्याने येथील नागरिकांना रस्त्याअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.पिंकी मूळची याच तालुक्यातील गैरकामथमधील होती. तीनच वर्षांपूर्वी तिचे खाणीची वाडी येथील मंगेश वाघमारे या तरु णाशी लग्न झाले होते. त्या दोघांचा सुखाने संसार सुरू असतानाच मागील आठवड्यात अचानक पिंकीची तब्बेत बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. वाडीपासून जवळच असलेले बीड आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने नाइलाजाने तिला पहाटे कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रस्ता नसल्याने झोळीतून नेताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, आता तरी विकासाच्या भूलथापा मारणाºया पुढाºयांना या वाडीकडील रस्ता करण्याची बुद्धी सुचेल का? असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला आहे.आदिवासी भागात विकास झपाट्याने होत आहे, असा डांगोरा नेहमीच पिटला जातो; परंतु आदिवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहता, सरकारने आदिवासींची थट्टाच चालविली आहे. अनेक आदिवासीवाड्यांतील विद्यार्थी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शहरी भागाकडे धाव घेतात. डोंगर-दºयातून मातीच्या रस्त्यांच्या पायवाटा शोधत ७-८ कि.मी.ची पायपीट करीत शिक्षण घेतात. हे हाल लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत का? असा प्रश्नदेखील आदिवासींनी उपस्थित केला असून शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.>खाणीकडे जाणारी मृत्यूची बिकट वाटसभोवताली उंच उंचच डोंगर, घनदाट अरण्य, दाट झाडी, सहा ते सात फूट उंच गवत, ओढे -नाले, खाच-खळगे कसेबसे पार करत बीड गावावरून खाणीच्या वाडीकडे जावे लागते. उन्हाळ्यातील पायवाट पावसाळ्यातील उगवलेल्या जंगली झाडाझुडपांमध्ये कधीच दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे झाडाझुडपातून वाट काढत खाणीची वाडी गाठावी लागते. ही वाट काढताना गवतात लपलेले साप, विंचू कधी दंश करतील याचा नेम नाही. जंगल परिसर असल्याने जंगली श्वापदांच्या हल्ल्याची ही तेवढीच भीती असते. यामुळे जीव मुठीत धरूनच मार्गक्र मण करावे लागते.>रस्त्याअभावी आमच्या आदिवासीवाडीतील महिलेला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. बीड ते खाणीची वाडी, तसेच स्टेशन-ठाकूरवाडीकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर करावा, रस्त्याअभावी मृत्यू होणे ही लाजिरवाणी बाब आहे, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ २६ जानेवारीला आंदोलनात सहभागी होऊ.- अरुण वाघमारे, स्थानिक ग्रामस्थ>पावसाळ्यात तर ओढे-नाले दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे पायवाटेतील ओढे-नाले पार करताना वाहून जाण्याची भीती असते. शाळेतील लहान मुले, गर्भवती महिला यांची तर फारच तारांबळ उडते.- अशोक जंगले, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आदिवासींची वाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:52 AM