श्रीवर्धननंतर अलिबाग समुद्रकिनारी पाण्यातून वाहून आला अंमली पदार्थचा साठा
By राजेश भोस्तेकर | Published: August 31, 2023 07:51 PM2023-08-31T19:51:02+5:302023-08-31T19:51:15+5:30
अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंमली पदार्थाची पाकिटे वाहून आल्याचे समजले.
राजेश भोस्तेकर
आक्षी समुद्र किनारी सापडली सहा पाकिटे
जिल्ह्यात आतापर्यंत सापडली साडे सहा कोटीची पाकिटे
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील पाच समुद्रकिनारी पाच कोटीची १०२ किलोची ११९ अंमली पदार्थाची पाकिटे सापडली असताना गुरुवारी अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनारी साधारण २५ लाखाची एक किलो वजनाची सहा पाकिटे वाहून आली आहेत. अलिबाग पोलिसांनी ही पाकिटे जप्त केली आहेत. तर बुधवारी रेवदंडा समुद्रकिनारी १ कोटीची पाकिटे सापडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात साडे सहा कोटीहून अधिक किमतीची अंमली पदार्थाची पाकिटे सापडली आहेत. तर अजूनही अंमली पदार्थाची पाकिटे समुद्र मार्गे वाहत रायगडच्या किनाऱ्यावर येत आहेत.
अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंमली पदार्थाची पाकिटे वाहून आल्याचे समजले. त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पाकिटे जप्त केली आहेत. आक्षी समुद्र किनारी सहा पाकिटे वाहून आली होती. पाकिटे यांचे वजन केले असता ती एक किलो असून साधारण बाजारात पंचवीस लाख किंमत आहे.
बुधवारी रेवदंडा समुद्र किनारी ही एक कोटी किमतीची पाकिटे सापडली होती. श्रीवर्धन समुद्र किनारीही गुरुवारी १२ पाकिटे सापडली आहेत. याची किंमत पन्नास लाखाच्या घरात आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात साडे सहा कोटी किमतीची दीडशेहून अधिक अंमली पदार्थाची पाकिटे सापडली आहेत. त्यामुळे पाकिस्तान मधून आलेल्या बोटीतून समुद्रमार्गे आलेली ही अंमली पदार्थ पाकिटे नक्की कुठे नेण्यात येत होती याबाबत कारण स्पष्ट झालेले नाही आहे.