तहसीलदारांच्या आश्वासनानंतर ‘रास्ता रोको’ मागे
By admin | Published: May 24, 2017 01:24 AM2017-05-24T01:24:11+5:302017-05-24T01:24:11+5:30
आगरदांडा ते सावली या रस्त्याची चाळण झाल्याने तो रस्ता नव्याने बनण्यासाठी सोमवारी मुरुड आगरदांडा येथे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : आगरदांडा ते सावली या रस्त्याची चाळण झाल्याने तो रस्ता नव्याने बनण्यासाठी सोमवारी मुरुड आगरदांडा येथे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समिती मुरु डतर्फे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. त्या वेळी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष व पंचक्रोशीतील नागरिकांशी चर्चा करून तहसीलदारांच्या तोंडी आश्वासनानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
बांधकाम खात्याचे सहायक अभियंता नीलेश खिलारे या ठिकाणी आले. त्या वेळी संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालून, एक किलोमीटरच्या आसपास त्यांना त्याच रस्त्यावरून चालत नेऊन या रस्त्याविषयी प्रश्नांचा भडिमार के ला. या ठिकाणी असणारे पर्यटक किरण शिंदे (नाशिक) व महसुद राजपूरकर (श्रीवर्धन) यांनीही या रस्त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत आंदोलन होत नाही, तोपर्यंत रस्ते बनणार नाही का? असा प्रश्न बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला. आगरदांडा ते सावली रस्ता हा गेली १२ वर्षे नव्याने बनवला नाही व त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून छोटे-मोठे अपघात झाले आहेत, तरी बांधकाम खात्याला जाग येत नाही. या रस्त्यावरून गरोदर महिलांना प्रवास करणे जड झाले आहे. काही महिलांची प्रसूती मिनीडोर रिक्षामध्येच झाली होती, त्याकरिता हा रस्ता नव्याने बनविण्यासाठी गेली तीन वर्षे कुणबी समाजातर्फे निवेदने देण्यात आली. मात्र, त्या निवेदनाचा काही परिणाम बांधकाम खात्यावर झाला नाही. पुन्हा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवसांपूर्वीही निवेदन दिले गेले होते. रस्त्यावरचे खड्डे न बुजवल्यास २२ मे रोजी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. बांधकाम अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाकडे फारसे लक्ष न दिल्याने सोमवारी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समितीने आगरदांडा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यास सुरुवात के ली होती.या वेळी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समिती अध्यक्ष राजेश कर्जेकर, सचिव रमेश कांबळे, मनोहर वासकर, रमेश पाटील, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या रास्ता रोको आंदोलनासाठी मुरु ड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश भोसले, उपनिरीक्षक संजय हेमांडे, पोलीस नाईक प्रवीण लोखंडे व १३ पोलीस कर्मचारी तैनात होते.