अडीच वर्षांनी भेटल्यानंतर वडिलांनी मारली मिठी, मुलगा जिवंत असल्याची सोडली होती आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 11:53 AM2023-02-01T11:53:05+5:302023-02-01T11:53:30+5:30
Family : उत्तर प्रदेश येथील पिता-पुत्राची अडीच वर्षांनी भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
माणगाव : माणगावमध्ये फिरत असलेल्या अनेक मनोरुग्णांना माणगावचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन त्यांना उपचाराकरिता मनोरुग्णालयात पाठविण्यात येते. अशाच प्रकारे उत्तर प्रदेश येथील पिता-पुत्राची अडीच वर्षांनी भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
उत्तर प्रदेश येथील गाझीपूर भागातील ३० वर्षीय तरुण मनजे ऊर्फ मुलायम राजपूत शिवमुनी रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरात मनोरुग्ण अवस्थेत फिरत होता. माणगाव पोलिसांनी त्याला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू झाले त्यावेळी त्याने फक्त दोन शब्द उच्चारले ते म्हणजे ‘दिलदार नगर, धनाडी’. यावरून समाजसेवा शाखेच्या अधीक्षक स्वाती कुलकर्णी यांनी त्याच्या घराचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्याशी वारंवार संवाद साधून त्याकडून आणखी माहिती घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार गाझीपूरमधील पोलिसांसोबत संपर्क केल्यावर त्यांनी घर शोधले आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला.
कुलकर्णी यांनी कॉलद्वारे त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधताच, आईवडील निःशब्द झाले आणि त्यांना रडू कोसळले. ‘बहुत इसको ढुंढा, मिलही नहीं रहा था, हमने इसकी जिने की उम्मीद छोड़ दी थी, हमारा लडका हमे मिलेगा यह सपने मे भी नही सोचा था,’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली.
गरिबीमुळे तक्रारही नव्हती केली!
मुलाला घरी जाण्यासाठी कपडे नसल्याने पित्याने अंगावरचे कपडे त्याला देऊ केले. दारिद्र्य रेषेखालील हे कुटुंब असल्याने त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही केली नव्हती. ते फक्त आपल्या मुलाला शोधतच होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.